Sangli News : डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फौंडेशनच्या माध्यमातून देशातील सर्वांत मोठी महारक्तदान यात्रा अभियान हाती घेण्यात आली आहे. देशसेवा व राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून जय हिंद महारक्तदान यात्रा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत पुढील 5 ते 6 महिन्यात प्रत्येक तालुक्यात मिळून एक लाख युवक रक्तदान करणार आहेत. या यात्रेचा शुभारंभ पुण्यातील आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करुन होणार आहे. ही यात्रा उपक्रम पूर्णपणे देशासाठी आणि भारतीय लष्करासाठी समर्पित असणार आहे. सांगली जिल्ह्यातून तब्बल एक लाख रक्तदान संकल्प करण्यात आला आहे. 


देशसेवा बजावणाऱ्या आर्मी आणि 'थॅलेसेमिया'ग्रस्त (thalassemia) मुलांसाठी या रक्तदान अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 18 मे रोजी या यात्रेचा शुभारंभ कराड ते पुणे अशी भव्य दुचाकी रॅली काढून आर्मी हॉस्पिटल येथे प्राथमिक रक्तदान करुन करण्यात येणार आहे. या रॅलीत दोन हेलिकॉप्टर देखील सहभागी होणार असल्याची माहिती डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली. महारक्तदान यात्रा सुमारे दीडशे ते दोनशे दिवस सांगली जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक गावातून दररोज रक्त संकलन करण्यात येणार आहे. 


त्याचबरोबर दररोज पुण्याच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदाते रक्तदान करतील याचेही नियोजन करण्यात आलं आहे. या रक्तदान यात्रेसाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्था आणि प्रशासनाची देखील मदत घेण्यात येणार आहे. देशसेवा करणाऱ्यांसाठी हा उपक्रम असून या अभियानात रक्तदान करण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रहार पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. सैन्यदलात कर्तव्य पार पाडताना जखमी होणाऱ्या सैनिकांसाठी जिल्ह्यातून रक्त संकलित केले जाणार आहे. सांगली जिल्ह्यात शासकीय, खासगी पेढ्यांना हे रक्त पुरवलं जाईल. 'थॅलेसेमिया' विकाराने ग्रस्त मुलांनाही दिले जाईल. अपघातातील जखमी व सेनेतील जखमी सैनिकांना त्याचा फायदा होईल.


रॅलीत 250 मोटारींसह दोन हेलिकॉप्टर्सचे आकर्षण


मोहिमेचा प्रारंभ येत्या 18 मे रोजी कराड ते पुणे रॅली काढून होणार आहे. त्यामध्ये सुमारे 250 मोटारी आणि दोन हेलिकॉप्टर्स असतील. रॅली पुण्यात गेल्यानंतर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे, तेथे सैनिकी रुग्णालयात रक्तदानाने मोहिमेची सुरुवात होईल. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व गावात आगामी पाच-सहा महिने शिबिरे होतील. त्यानंतर सांगता सांगली महापालिका क्षेत्रात होईल.


इतर महत्वाच्या बातम्या