सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या (Sangli News) महाभरतीत गैरप्रकार झाल्याने राबवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेसाठी घेतलेलं शुल्क राज्य सरकारकडून परत केलं जाणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्याचा हिरमोड झाला आहे. राज्य सरकारने जिल्हा परिषदेतील (Sangli ZP) विविध 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च 2019 आणि ऑगस्ट 2021 मध्ये महाभरती प्रक्रिया सुरु केली होती.
या दोन्ही जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी यासाठी परीक्षा शुल्कासह 24 हजार 882 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु पुढे ही भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्याने ही महाभरती रद्द केली होती. या विद्यार्थ्यांचे 51 लाख 65 हजार 62 रुपये शासनाने मंजूर केले असून त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
परीक्षा शुल्क बँक खात्यात जमा होणार
सांगली जिल्हा परिषदेकडील रिक्त पदासाठी 24 हजार 882 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. या विद्यार्थ्यांचे 79 लाख 46 हजार 250 परीक्षा शुल्क राज्य सरकारकडे जमा आहे. यापैकी शासनाने सध्या 51 लाख 65 हजार 62 रुपयांचे परीक्षा शुल्कची रक्कम मंजूर केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 3 हजार 622 विद्यार्थ्यांची 11 लाख 37 हजार 500 रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. परीक्षा शुल्क हे जिल्हा परिषदांच्या माध्यमातून परत करण्याचा आणि यासाठी आवश्यक निधी जिल्हा परिषदांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.
दोन्ही जाहिरातीनुसार परीक्षा शुल्कासह उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 65 टक्के परीक्षा शुल्क उमेदवारांना परत केले जाणार आहे. परीक्षा शुल्क परत करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी ज्या जिल्हा परिषदेतील भरतीसाठी अर्ज दाखल केला होता, त्याच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पैसे परत देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने सर्व जिल्हा परिषदांना शुल्क परताव्याबाबतच्या याद्या पाठविल्या आहेत. या याद्यांमध्ये उमेदवाराचे नाव आणि त्याला परत मिळणाऱ्या शुल्काची रक्कम नमूद केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या