सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (swabhimani shetkari sanghatana) सांगलीत सुरु असलेल्या ऊस दर आंदोलनावरुन जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरल्याने जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे. या बैठकीत जिल्ह्यातील कारखानदारांच्या मागण्यांबाबत 30 नोव्हेंबर पर्यंतची मुदत मागितली आहे. दुसरीकडे, कारखाना प्रमुखांनी या महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला. चार दिवसात प्रशासनाने पुन्हा बैठक बोलवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनाकडे केली आहे. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
दुसरीकडे, ऊस दर आणि मागील बाकीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत द्यावी, तोपर्यंत तोडलेल्या ऊसाची वाहतूक अडवू नये अशी विनंती कारखानादारांनी बैठकीत केली. आंदोलकांनी शांततेत आपले आंदोलन करावे, ऊस उत्पादक आणि कारखाना प्रमुखांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
दरम्यान, गेल्या हंगामातील उसाला प्रति टन 400 रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी प्रति टन 3500 रुपये द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. राजू शेट्टी यांना राजकीय आव्हान मिळू लागले असल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका
दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऐन दिवाळी सणात ऊसदर आंदोलनाचा भडका उडाला आहे. ट्रॅक्टर उलथवून टाकण्याचा प्रकार टाकळीवाडीमध्ये घडला. वारणा साखर कारखान्याकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर पेटवून देण्यात आले. वारणा कारखान्याची वाहतूक का रोखली जात नाही, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर पेटवून देण्यात आले. वारणा साखर कारखान्याचा ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अज्ञातांनी पेटवून दिला. ही घटना वठार-पारगाव रस्त्यावर चावरे फाट्याजवळ घडली. राज्य सरकार व कारखानदार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करू लागल्याने लोकांची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या