Ratnagiri News : चीनच्या समुद्रात निर्माण झालेल्या नरु चक्रीवादळाचा परिणाम राज्यात देखील दिसत आहे. राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. नरु चक्रीवादळामुळं बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र प्रभावित झालं आहे. त्याचे पडसाद राज्यसह कोकण किनारपट्टीवर उमटले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरीला वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसानं चांगले झोडपून काढले आहे. तसेच 10 ऑक्टोबरपर्यंत काही ठिकाणी वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक लागला असून, हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे. 


खरीपातील शेती पिकांचं मोठं नुकसान


वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु असल्यामुळं किनारपट्टीवरील मासेमारी ठप्प झाली आहे. तर खरीपच्या शेती पिकांचे देखील मोठं नुकसान होऊ लागले आहे. जिल्ह्यात 10 ऑक्टोबरपर्यंत काही ठिकाणी वेगवान वाऱ्यासह विजांचा कडकडासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनचा परतीकडे प्रवास सुरु असतानाच आठवडाभराच्या ब्रेकनंतर पुन्हा दमदार पावसाला आरंभ झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात या पावसाने बस्तान बसवलेले आहे. रत्नागिरी, लांजा,राजापूर, चिपळूण, संगमेश्वर या भागात या पावसाचा जोर अधिक पाहायला मिळत आहे.




बदलत्या हवामानाचा परिणाम पावसावर परिणाम


दरम्यान, शुक्रवारी सकाळपासून अगदी दुपारपर्यंत या पावसाने झोडपून काढले. त्यामुळं नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम परतीच्या पावसाचा मुक्काम लांबला आहे. कोकण किनारपट्टी भागात जिल्ह्यात काही ठिकाणी 30 ते 40 प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह विजेच्या कडकडासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं किनारपट्टीवरील मासेमारीला मोठा फटका बसला आहे. खराब हवामानामुळं मासेमारी ठप्प झाली आहे.


राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी


राज्यात परतीच्या पावसानं  थैमान घातलं आहे. विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. हवामान विभागनं (meteorological department) दिलेल्या अंदाजानुसार मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. रात्रभर मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. या पावसामुळं अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच राज्यातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, हिंगोली, वाशिम, पालघर, यवतमाळ, लातूर या जिल्ह्यांना देखील पावसानं झोडपून काढलं आहे. दरम्यान आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज संपूर्ण राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. येत्या चार ते पाच दिवसात राज्यात गडगडाटासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढला, आज संपूर्ण महाराष्ट्रात 'यलो' अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन