रत्नागिरी : दापोली समुद्रकिनारी सापडलेली बोट ( Boat found On Dapoli beach) संशयास्पद नाही, असा खुलासा तटरक्षक दलाने (Coast Guard ) केला आहे. विजयदुर्ग किनाऱ्यावर बुडालेल्या पार्थ जहाजाच्या लाईफ क्राफ्टचा तो भाग असल्याची माहिती तटरक्षक दलाकडून देण्यात आली आहे. शिवाय नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 


दापोली समु्रकिनारी संशयास्पद बोट सापडल्याची माहिती काल स्थानिक मच्छिमारांकडून प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानंतर तटरक्षक दलाच्या मदतीने याबाबची चौकशी करण्यात आली. यावेळी ही बोट संशयास्पद नसून विजयदुर्ग किनाऱ्यावर बुडालेल्या पार्थ जहाजाच्या लाईफ क्राफ्टचा तो भाग असल्याची माहिती तटरक्षक दलाकडून देण्यात आली. शिवाय विजयदुर्ग किनाऱ्यावर पार्थ जहाज बुडाल्यानंतर याच लाईफ क्राफ्टच्या माध्यमातून 19 जणांची सुटका करण्यात आली होती, अशी माहिती देखील तटरक्षक दालकडून देण्यात आली. 


दुबईहून-बेंगलोरच्या दिशेने जाणारे पार्थ हे तेलवाहतूक करणारे जहाज 16 सप्टेंबर रोजी विजयदुर्ग किनाऱ्यानजीक बुडाले होते. सुदैवाने या जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांना तटरक्षक दलाने वाचविले होते. हे तेलवाहू जहाज दुबईहून बेंगलोरच्या दिशेने जात असताना जहाजाच्या तळाला भोक पडल्याने विजयदुर्ग किनाऱ्यापासून चाळीस वावामध्ये हे जहाज बुडत असताना जहाजावरील कर्मचाऱ्यांनी तटरक्षक दलाशी संपर्क साधला. त्यानंतर रत्नागिरी येथील तटरक्षक दलाने येवून या जहाजावरील 19 कर्मचाऱ्यांना वाचविले होते. 


दरम्यान, ऑगस्ट महिन्यात रायगड (Raigad Suspected Boat  )  येथे संशयित बोट आढळल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या बोटीत एके-47 रायफल्स सापडल्यामुळे देशभरात खळबळ माजली होती. मुंबई पुण्यासह राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. या प्रकरणामुळे रायगडमध्ये सर्व तपास पथकांनी धाव घेतली होती. परंतु, तपासानंतर ही बोट ऑस्ट्रेलियातील एका महिलेची असल्याची माहिती समोर आली होती. शिवाय या बोटीपासून कोणताही धोका नसून ती चुकून रायगड समुद्रकिनारी आल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. 


‘रायगडच्या किनाऱ्यावर सापडलेल्या या बोटीचे लेडी हान असे नाव होते. त्या बोटीची मालकी ऑस्ट्रेलियाच्या एका महिलेची होती. ही बोट मस्कतहून युरोपला जात होती. बोटीचं इंजिन खराब झाल्यामुळे ती भरकटली होती.  त्यामुळे बोटीतील प्रवाशांना कोरियन युद्धनौकेने वाचवले होते.पाणी तुंबल्याने बोट ओढता आली नाही आणि त्यामुळे ती वाहून गेली. ही बोट ऑस्ट्रेलियाच्या महिलेचीच असल्याचे नेपच्यून सेक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीने सांगितले होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. त्यातच आता दापोली समुद्रकिनारी ही बोट सापडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, ही बोट संशयास्पद नसून ती विजयदुर्ग किनाऱ्यावर बुडालेल्या पार्थ जहाजाच्या लाईफ क्राफ्टचा तो भाग असल्याची माहिती तटरक्षक दलाकडून देण्यात आली आहे.


महत्वाच्या बातम्या


रायगड संशयित बोट प्रकरणात मुंबईत आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा, एके-47 सह बोटीवर 2 चॉपरही आढळले 


रायगड येथील संशयित बोट प्रकरणाचा तपास एटीएस करणार