Ratnagiri News : अतिवृष्टीमुळे कोकणातील (Kokan) अनेक गावागावांत प्रचंड नुकसान झाले. रत्नागिरीतील (Ratnagiri) वाशिष्टी नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील साकव, पूल अक्षरशः वाहून गेले. अतिवृष्टी होऊन एक वर्ष होऊन गेलं पण अतिवृष्टीमुळे झालेल्या काही गावांच्या समस्या अजूनही दूर झालेल्या नाहीत. साकव वाहून गेल्याने गावातील दळणवळणाचा मार्गच बंदच झाला आहे. पण गावकऱ्यांनी मानवनिर्मित साकवावरुन ये-जा सुरु केली आहे, पण ही जीवघेणी कसरत आहे.
 
कोकणात जुलै 2021 मध्ये अतिवृष्टी झाली. धो-धो कोसळणारा पाऊस आणि गावच्या नद्यांना येणारा पूर. त्यात कोकणातील काही गावे सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने तिथे पावसाचे प्रमाणही जास्त. जिथे वाशिष्टी नदीचा (Vashishti River) उगम होते ते खेड तालुक्यातील चोरवणे गाव. हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी असून तिथेच वाशिष्टी नदीचा उगम होतो आणि या उगमापासून जवळपास चार ते पाच किलोमीटर असलेले साफरोली गाव (Safroli Village). या गावात जाण्यासाठी वाशिष्टीवर साकव बांधण्यात आला. यावरुनच गावातील रहिवासी आपले दैनंदिन जीवन जगण्याची लागणाऱ्या गरजा, वस्तूसाठी शहराकडे याच साकवावरुन ये-जा करत. आता हा लोखंडी साकव राहिलेला नाही. कारण गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत हा पूर्ण वाहून गेला आहे. आता राहिलाय तो फक्त लोखंडी सांगाडा.


डोलीतून नेताना नदीपात्रातून जाताना गावकऱ्यांची मोठी कसरत


नदीवरील साकव वाहून गेल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. गावात एखादी व्यक्ती आजारी पडला तर त्याला डोलीतून न्यावं लागतं. गावातील गावकऱ्यांनी दोन लांबलचक बांबूच्या साहाय्याने तयार केलेली गोलाकार लाकडी डोली. गावात यायला रस्ता नाही त्यामुळे डॉक्टर सुद्धा इकडे येत नाहीत. डोलीतून नेताना या नदीपात्रातून जाताना गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. 


मुलांच्या शाळेचा खोळंबा, सुख-दु:खाच्या कार्यक्रमापासून माहेरवाशिणी दूर


एवढंच नाही तर गावातील मुलांच्या शाळेचाही खोळंबा होत आहे. पावसाळ्यात नदीला जास्त पाणी असल्याने मुले शाळेत जात नाहीत. गावातील माहेरवाशीण गावत असलेल्या सुख-दु:खाच्या कार्यक्रमात सुद्धा सहभागी होण्यासाठी गावात यायचं म्हटलं तर या साकवावरुन जीव हातात घेऊन नदी पार करावी लागते.


गावकऱ्यांच्या जीवघेण्या प्रवासाकडे नवं सरकार लक्ष देणार? 


गावकरी गेली वर्षभर सरकारी दरबारी या साकवासंदर्भात दुरुस्ती किंवा नवा पूल व्हावा यासाठी फेऱ्या मारत आहेत, पण कोणीही याकडे लक्ष देत नाहीत.
अतिवृष्टीत बाधित झालेल्या गावातील पूल किंवा साकवांच्या नव्याने उभारणीसाठी किंवा दुरुस्तीसाठी निधीची घोषणाही केली. मात्र तो निधी आजवर कागदावरच राहिला. त्याची अंबलबजावणी अद्यापही झाली नाही. सरकारी कामाच्या अनास्थेचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यामुळे राज्यात नव्याने आलेले सरकार तरी याकडे लक्ष देणार का, या साकवावरुन जीवघेणा गावकऱ्यांचा प्रवास थांबेल का हे पाहावं लागेल.