रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हावासियांसाठी रविवारची (5 जून) रात्र अपघाताची काळ रात्र होती. कारण रविवारी रात्री लांजा आणि राजापूर येथे झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. लांजा तालुक्यातील अंजणारी पुलावर मालवाहू ट्रक आणि कारच्या अपघातात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. 


रत्नागिरीहून लांजाकडे मालवाहू ट्रक निघाला होता. पण अंजणारीच्या घाटात ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि त्याची धडक मालवणवरुन चिपळूणकडे जाणाऱ्या कारला बसली. यामध्ये कारमधील दोघांचा आणि मालवाहू ट्रकचालकाचा मृत्यू झाला. कारमधील दोघे गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर दोन्ही वाहने पुलावरुन खाली कोसळली. या भीषण अपघातात ट्रक चालक विजय सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. तर, कार चालक समीर प्रदीप शिंदे आणि त्यांची आई सुहासिनी प्रदीप शिंदे यांनी देखील जागीच प्राण गमावले. कार चालक समीर शिंदे यांच्या पत्नी समृद्धी शिंदे आणि वडील प्रदीप हिम्मतराव शिंदे हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


तर, दुसरीकडे मुंबई-गोवा हायवेवर राजापूर तालुक्यातील कोदवली गावाजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. रात्री 10.45 वाजता हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही.


कसा झाला असावा अपघात? 
अंजणारी बस स्टॉप ते अंजणारी पुल या दरम्यान तीव्र उतार आहे. मोठ्या प्रमाणात गाड्यांची ये-जा या ठिकाणी सुरु असते. रत्नागिरीहून लांजाकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये माल भरलेला होता. पण, अंजणारी येथे आल्यानंतर अचानक ट्रकचा ब्रेक फेल झाला. यावेळी मोठ्या अपघाताची शक्यता अधिक जास्त. कारण, रात्रीच्या वेळी मुंबई-गोवा हायवेवर मुंबईकडे जाणाऱ्या बसेस मोठ्या प्रमाणात धावत असतात. शिवाय, इतर प्रवासी वाहतूक देखील सुरु असते. अशास्थितीत ट्रक चालक असलेले सावंत काही मीटरपर्यंत गाडीचा अपघात टाळण्यास यशस्वी देखील झाले. पण, नियतीच्या मनात सारं काही सुरळीत व्हावं असं नव्हतं. याचवेळी मालवणहून चिपळूणच्या दिशेने शिंदे कुटुंबिय आपल्या कारमधून जात होते. ब्रेक फेल झालेला आणि मालाने भरलेल्या या ट्रकची धडक त्यांच्या कारला बसली. यावेळी कारमध्ये एकाच कुटुंबातील चार जण होते. अपघातानंतर ट्रक चालक सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. शिवाय, कारमधील गंभीर जखमी दोघांना देखील आपले प्राण गमवावा लागले. सध्या अपघातातून बचावलेल्या आणि गंभीर जखमी असलेल्या दोघांवर उपचार सुरु आहेत. 


मुंबई-गोवा हायवेचं राजापूर येथे देखील अद्याप काम सुरु आहे. काही ठिकाणी एक बाजू सुरु करण्यात आली आहे. यावेळी कार चालकांचा अंदाज चुकतो. अशीच काहीशी गोष्ट राजापूर येथे ट्रकच्या अपघातामध्ये झालेली असावी. रात्रीच्या वेळी अंदाज चुकल्याने दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झाली.


मुंबई-गोवा हायवे वर्दळीचा मार्ग 
मुंबई-गोवा मार्ग हा कायमच वर्दळीचा मार्ग आहे. सध्या सुट्ट्या संपत आल्याने मोठ्या प्रमाणात गाड्यांची वर्दळ वाढली आहे. काही वेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने किंवा रस्त्यांचा अंदाज न आल्याने देखील अपघात होत आहेत. महामार्गावर बऱ्याच ठिकाणी डायवर्जन किंवा रस्त्यांच्या खोदकामाचा अंदाज लागत नाही. अशावेळी गाडीचा वेग असल्यास अपघाताची शक्यता जास्त असते. सध्या या मार्गावर काम वेगाने सुरु आहे. पण, डायवर्जनचा अंदाज घेण्यामध्ये अनेक वेळा वाहन चालकांची गफलत होत असल्याचं चित्र आहे. 


इतर बातम्या