रत्नागिरी : डोंगर दऱ्यांतून धावणारी कोकण रेल्वे पावसाळ्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या कोकण रेल्वेने पावसाळ्याची तयारी जोरात केली असून वेळापत्रकात देखील बदल केला आहे. त्यामुळे यापुढे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचा वेग काहीसा मंदावणार आहे. कोकणातील पाऊस आणि डोंगर दऱ्यांचा प्रदेश यांचा विचार करता हा निर्णय दरवर्षी घेतला जातो. मागील नऊ वर्षात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळून वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याच्या मोठ्या घटना घडलेल्या नाहीत. यंदा कोकण रेल्वेकडून चोवीस तास गस्तीसाठी 846 जणांची नियुक्ती केली आहे. शिवाय 10 जूनपासून गाड्या पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहेत. रेल्वे रुळांच्या शेजारी असणारी गटारं आणि रुळांच्या कामाकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आलं आहे. पावसाळ्यामध्ये काही वेळा दृश्यमानता देखील कमी होते. त्यासाठी ज्या ठिकाणी दृश्यमानता कमी असेल अशा भागात किंवा ठिकाणी 40 किमी प्रति तास इतक्या वेगाने गाड्या चालवाव्यात अशा सूचना देखील लोको पायलटना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी येथे वैद्यकीय मदतीसाठी सेल्फे प्रोपेल्ड एआरएमव्ही तर वेर्णा येथे अॅक्सिडेंट रिलिफ ट्रेन सज्ज ठेवण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रत्येक स्टेशन्सवर वायरलेस संपर्क साधता येईल याची व्यवस्था केली गेली आहे. मुख्य म्हणजे इमर्जन्सी कम्युनिकेशन सॉकेटस सरासरी एक किमी अंतरावर असणार आहेत. 



पाऊस मोजण्यासाठी यंत्रणा 
कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो. दरम्यान, हिच बाब लक्षात घेत नेमका किती पाऊस झाला यासाठी कोकण रेल्वे मार्गावर सेल्फे रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसवण्यात आले आहेत. माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उड्डपी या स्टेशन्सवर सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसवण्यात आली आहेत. तर, रत्नागिरी-निवसर स्थानकांदरम्यान पानवल पुलावर, मांडवी पूल, झुआरी ब्रिज आणि शरावती ब्रिज या ठिकाणी वाऱ्याचा वेग नोंदवणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. 


सध्या कोकणात पावसाची काय आहे स्थिती? 
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास काही ठिकाणी पावसाचं आगमन झालं आहे. काही भागांमध्ये रिमझिम तर काही भागांमध्ये मुसळधार पावसाची सर कोसळत असल्याचं चित्र आहे. कोकणातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आहे. पावसाच्या सरी कोसळत असल्याने काही ठिकाणी गारवा तर काही भागात उकाड्यामध्ये वाढ झालं आहे.