रत्नागिरी  : रत्नागिरी शहरातील ट्रॅफिक पोलिसांच्या भाईगिरीचा विषय सध्या शहरात चर्चिला जात आहे. रत्नागिरी शहरात दुध विकण्यासाठी आलेल्या बाईकस्वाराचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करत त्याला मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला आहे. यावेळी ट्रॅफिक पोलिसानं कानशिलात लगावल्यानं बाईकस्वाराच्या कानातील पडद्याला इजा झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. याबाबत ट्राफिक पोलिस निरिक्षक शिरीष सासणे यांनी संपूर्ण प्रकरणात लक्ष घालत कारवाईचं आश्वासन दिलं आहे.


रत्नागिरी शहराजवळील वेतोशी गावातील रहिवाशी असलेले रमेश झोरे हे दुध घालण्यासाठी रत्नागिरी शहरात येतात. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आपल्या घरी जात होते. यावेळी रस्त्यावर खुर्चीचा व्यवसाय करण्यासाठी शहरात फिरणाऱ्या बाईकस्वारांवर कारवाई सुरू होती. यावेळी बाईकवरून जाताना झोरे यांनी 'साहेब त्यांना जाऊ दे' असा शब्दप्रयोग केला. हाच राग मनात धरत कारवाई करणाऱ्या प्रशांत बंडबे या ट्रॅफिक हवालदारानं तब्बल दोन किलोमीटरचा पाठलाग करत बाईकस्वाराला मारहाण केली आहे. याबाबत रत्नागिरी शहरातील वाहतूक पोलिस निरिक्षक शिरिष सासणे यांच्याशी बोलणे केले असता आम्ही योग्य ती कारवाई करू अशी प्रतिक्रिया दिली आहे. पण, प्रसारमाध्यमांसमोर बोलण्यास मात्र नकार दिला आहे.


रत्नागिरी शहरात ट्रॅफिकचे नियम कडक 


कोरोना काळात रत्नागिरी शहारात देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. अर्थात याबाबत संमिश्र प्रतिक्रिया रत्नागिरी शहरातील नागरिकांनी दिल्या होत्या. दरम्यान, पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईबाबत नाराजीचा सूर देखील दिसू लागला. पोलिस कोणतीही गोष्ट ऐकून न घेता फाईन मारतात अशा तक्रारी देखील केल्या गेल्या. त्यानंतर तत्कालीन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शहरातील हेल्मेट सक्ती मागे घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे सध्या रत्नागिरी शहरामध्ये हेल्मेटबाबत सध्या शिथिलता पाहायाला मिळत आहे. असं असलं तरी इतर कारणांवरून कारवाई सध्या सुरू आहे. याच कारवाईतून ट्रॅफिक पोलिसांनी मोठ्या रक्कमेचा दंड देखील वसूल केला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाईबाबतचा आपला मोर्चा शहराबाहेर वळवल्याचं चित्र आहे. पण, सध्या मात्र ट्राफिक पोलिसांचं वागणं, त्यांच्याकडून होत असलेल्या कारवाईबाबत नाराजीचा सूर रत्नागिरी शहरातील नागरिकांकडून पाहायाला मिळत आहे. त्यानंतर आता ट्रॅफिक पोलिसांनं केलेल्या मारहाणीचा सध्या शहरातील नागरिकांनी निषेध केला आहे.