रत्नागिरी : कोकणात (Konkan) गेल्या तीन महिन्यांपासून मच्छिमारी बंदी लागू असल्याने पर्सनेट मच्छिमारीला (Persinet Fishing) आजपासून (1 सप्टेंबर) सुरुवात झाली. खरंतर 1 ऑगस्टपासून मासेमारीला (Fishing) सुरुवात होते. मात्र पर्सनेट, फिशिंग ट्रॉलर यांना मासेमारीसाठी 1 सप्टेंबरची वाट पाहावी लागते. ती प्रतिक्षा आता संपली असून आजपासून मोठ्या नौका समुद्रावर स्वार झाल्या आहेत. 


मागील महिन्याभरात समुद्राला आलेले उधाण, त्यात समुद्रामध्ये येणाऱ्या अजस्त्र लाटा आणि त्याच्या जोडीला वारा अशा प्रतिकूल स्थितीचा सामना नव्या हंगामाच्या सुरुवातीला मच्छीमारांना करावा लागला. या स्थितीमध्ये आजपासून पर्ससीन नेटद्वारे सुरु होणाऱ्या मासेमारीच्या नव्या हंगामाला सामोरे जावे लागणार आहे. मच्छिमाराला समुद्रातील प्रतिकूल ठरणारे संभाव्य हवामान अन्‌ वातावरण, त्याच्या जोडीला समुद्राच्या पाण्यामध्ये असणारा करंट यांचा अंदाज घेत मच्छिमार बांधव हातामध्ये जाळी घेत समुद्रामध्ये झेपावण्यास सज्ज झाला आहे. 


बंदर परिसरातील बाजारपेठ पुन्हा गजबजली


रत्नागिरीतील मिरकरवडा बंदर जेटीवर दरदिवशी मच्छी व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. तसेच पर्ससीन नेट, फिशिंग ट्रॉलर, यांत्रिक होड्या, बिगरयांत्रिक होड्या अशा सर्वच नौका मासेमारी करतात. मच्छी व्यवसायातून वर्षाला 100 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची याठिकाणी उलाढाल होते. या वर्षीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार बांधव सज्ज झाले आहेत. होड्यांवरील खलाशीही बंदरामध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे बंदर परिसरातील बाजारपेठ पुन्हा एकदा गजबजू लागली आहे. 


मासेमारासाठी सद्यःस्थितीमध्ये प्रतिकूल वातावरण आहे. समुद्रातील पाण्यालाही चांगलाच करंट आहे. या साऱ्या प्रतिकूल स्थितीचा अंदाज घेऊन पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करण्यासाठी मच्छीमार बांधव सज्ज झाला आहे.


कोकणात 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरु


शासकीय नियमानुसार 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरु झाला आहे. समुद्री वातावरण, वारे आणि पाऊस यांचा अंदाज घेऊन दर्याला श्रीफळ अर्पण करुन अनेक मच्छिमारांनी मासेमारीला सुरुवात केली. 1 जून ते 31 जुलै असा 61 दिवसांचा बंदी कालावधी मागील काही वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आला आहे. मुंबई, अलिबाग, डहाणू, वसई, उरण, नाव्हा शेवा, हर्णे, जयगड, रत्नागिरी, देवगड, मालवण, वेंगुर्ले यासारख्या राज्याच्या किनारपट्टीवरील लहान मोठ्या सुमारे 50 बंदरात मासेमारीची प्रत्यक्ष उलाढाल असते. राज्यात लाखाहून अधिक कुटुंब मासेमारीवर अप्रत्यक्ष अवलंबून आहेत. शिवाय परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणात खलाशी या ठिकाणी दाखल होत असतात. महाराष्ट्रातून वर्षाकाठी चार ते पाच लाख हजार मॅट्रिक टन इतकी मासेमारी होत असते.


हेही वाचा


Ratnagiri Fishing : रत्नागिरीत ताजे फडफडीत मासे मिळण्यास सुरुवात, बांगडा, कोळंबीचे दर परवडणारे, तर सुरमई, पापलेट, हलवा महाग; काय आहेत माशांचे दर?