रत्नागिरी:  सागरी पर्यटनाचा विचार करता रत्नागिरीतील  स्वच्छ व मनमोहक समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात. मात्र अलिकडील काळात अतिउत्साही पर्यटकांचा (Ratnagiri News) उत्साह त्यांच्या जीवावर बेततो आहे.  देवदर्शनासह सुट्टीतील मौज-मजा करण्यासाठी आरे-वारे समुद्रकिनारी आलेल्या रत्नागिरीतील गाडेकर कुटुंबियातील चौघेजण समुद्रात बुडाले. त्यातील तिघांना वाचवण्यात स्थानिकांसह नातेवाईकांना यश आले आहे . तर  पंकज रामा गाडेकर (वय 33 राहणार पुणे, मूळ कारवांचीवाडी रत्नागिरी) यांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी 6:30 वाजता ही घटना घडली.


नोकरीनिमित्त पुणे येथे स्थायिक असलेले पंकज रामा गाडेकर हे पत्नी मयुरी गाडेकर यांच्यासह रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील आपल्या गावी सुट्टीसाठी आले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गाडेकर कुटुंब रविवारी दुपारी अंगारकी संकष्टीनिमित्त गणपतीपुळे येथे विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी गेले होते. विघ्नहर्त्याचे दर्शन घेतल्यानंतर गणपतीपुळे येथील समुद्र धोकादायक असल्याने त्या समुद्रात न जाता गाडेकर कुटुंबीय आरे- वारे समुद्र किनारी दाखल झाले. सुमारे 5:30 वाजता गाडेकर कुटुंबीयातील पंकज रामा गाडेकर, मयुरी पंकज गाडेकर, बालाजी रामा गाडेकर व त्यांचा एक भाचा असे चौघेजण पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते.कमी पाण्यात मौजमजा सुरू असतानाच अचानक आलेला लाटेने पंकज गाडेकर लाटे बरोबर आत ओढले गेले. लाटे बरोबर ते आत जात असल्याचे लक्ष येताच त्यांची पत्नी मयुरी व भाऊ बालाजी हे त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेले. यावेळी तेही पाण्यात बुडू लागले.


रुग्णवाहिका तासाभराने घटनास्थळी दाखल


 यावेळी किनाऱ्यावर असलेल्या त्यांच्यासमवेत आलेल्या मुले,महिलांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत चौघांनाही पाण्याबाहेर काढले. परंतु पंकज गाडेकर हे खोल पाण्यात बुडाले असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. स्थानिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेला संपर्क केला, परंतु  रुग्णवाहिका तासाभराने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर चौघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पंकज रामा गाडेकर यांना मृत घोषित करण्यात आले.


पर्यटकांच्या सुरक्षेच्या बाबतीत शासनाचे अक्षम्य दुर्लक्षच


गेल्या काही वर्षात पर्यटकांचे हॉटस्पॉट असलेल्या या समुद्रकिनाऱ्यांवर बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी लाखो देशी विदेशी पर्यटक येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटतात. मात्र पर्यटकांच्या सुरक्षेच्या बाबतीत शासनाचे अक्षम्य दुर्लक्षच दिसून येते.


हे ही वाचा :


पाण्याचा खतरा, बुडाले अठरा; गेल्या तीन दिवसात राज्यात 18 जणांना जलसमाधी