रत्नागिरी : नैसर्गिक आपत्ती आली की सर्वात मोठा प्रश्न हा पुनर्वसनाचा असतो. 2021 मध्ये झालेल्या वादळी-वाऱ्याच्या अतिवृष्टीत सह्याद्रीच्या कडेवर राहणाऱ्या धनगरवाडीतील अनेक घरं जमीनदोस्त झाली. अशा परिस्थितीत तेथील रहिवाशांच्या समोर एकच प्रश्न उभा राहिला तो म्हणजे आपल्या डोक्यावरचे छत नव्याने उभे कसे करायचे? अशा वेळी 'नाम' फाऊंडेशनने पुढाकार घेतला आणि त्यांना घरे बांधून दिली. 


नैसर्गिक आपत्ती आली की सर्वात मोठा प्रश्न हा पुनर्वसनाचा असतो. जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड तालुक्यात 2021 मध्ये झालेल्या आपत्तीमध्ये अनेक लोक बेघर झाले. गेल्या वर्षी सुदैवाने मोठा पाऊस झाला नाही, तरीही पावसाळ्यापूर्वी संभाव्य धोका लक्षात घेऊन अनेक भाग दरडप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केला आणि त्या भागातील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला होता. मात्र स्थानिक ग्रामस्थ पुनर्वसनासाठी सहसा तयार होत नाहीत, झालेच तर त्यांचे पुनर्वसन कसे करायचे कुठे असाही प्रश्न निर्माण होतो. त्यात अनेकदा पुनर्वसन रखडते.


आकले गावातील डोंगराळ भागात वसलेल्या निंबारवाडीत खापरे कुटुंबातील चार पिढ्या तर ओवळीतील धामणा-धनगरवाडीत सात कुटुंब राहत होते. दोन्ही वाडीत एकूण एकोणिस कुटुंब होती. 2021 मध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत या दोन्ही वाड्यातील घरे जमीन दोस्त झाली सतत पडणाऱ्या पावसात आता राहायचं कुठं जगायचं कसं असा प्रश्न या रहिवाशांसमोर निर्माण झाला.


सतत पडणाऱ्या मुसळधार पावसात डोंगराच्या टेकडीवरून खाली येऊन गावात गावकऱ्यांचा आसरा घेतला. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना आपलं छत उभं करायचं होतं, मात्र या पावसाने सर्व काही त्यांचा संसार आणि छत हिरावून घेतलं होतं. त्यांच्याकडे पुन्हा नव्याने छत उभं करण्यासाठी काही शिल्लक राहिले नव्हतं. तर पुन्हा उभं करायचं म्हटलं तर पुन्हा वादळ-वारा, अतिवृष्टी जीव डोक्यात घेऊन पुन्हा तिथेच राहावं लागतं.


गावातील काही प्रमुख मंडळींनी हा प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित केला. चिपळूण तालुक्याचे प्रांताधिकारी प्रवीण पवार आणि तत्कालीन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी स्थानिक आमदार शेखर निकम यांच्या मदतीने त्यांना सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी घर मिळावे असा प्रस्ताव पुढील कार्यालयाकडे पाठवला. असं म्हटलं जात सरकारी काम आणि बारा महिने थांब. अधिक वेळ न वाया घालवता प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी नाम फाउंडेशन समोर या नवीन घरबांधणीसाठीचा प्रस्ताव मांडला. नाम फाउंडेशनचे प्रमुख अभिनेते नाना पाटेकर यांनी तिथे राहणाऱ्या लोकांची व्यथा आणि परिस्थिती समजून घेऊन ताबडतोब आम्ही त्यांची 19 घरे बांधून देऊ कबूल केले आणि त्यानंतर सर्व जबाबदारी नाम ने घेतली.


प्रशासन, लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने काय घडून शकते याचे अनोखे मॉडेल आकले आणि ओवळी गावात उभे राहिले आहे. नामच्या पुढाकाराने आज आकले आणि ओवळी येथील 19 बेघर कुटुंबांना त्यांच्या डोक्यावरचे हरपलेले छत पुन्हा नव्याने बांधून मिळाल्याने ते आज आनंदात राहत आहेत. प्रशासन आणि नाम फाउंडेशनने आमच्या गावातील अतिवृष्टीत बेघरांना घरे बांधून देउन आमच्या गावाला चांगले सहकार्य केले असे गावकरी म्हणतायत. 
 
सह्याद्रीच्या कडेकपारीत टेकडीवर राहणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी डोंगराच्या खाली गावातील वस्तीत घरे बांधून नाम फाउंडेशनने दिली. ही अविस्मरणीय आठवण येथील रहिवाशांच्या मनामनात कायमस्वरूपी राहिल.