Dapoli OBC Politics : राज्याच्या विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election) तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. या निवडणुकीत सर्वांचेच लक्ष कोकणातील (Kokan) खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाकडे (Khed-Dapoli Assembly Constituency) लागले आहे. हा मतदारसंघ रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा बालेकिल्ला आहे. त्यांचे पुत्र योगेश कदम (Yogesh Kadam) हे विद्यमान आमदार आहे. सध्या दापोली विधानसभेत घडत असलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता कुणबी समाज (Kunbi Community) देखील राजकीयदृष्ट्या एकवटू लागल्याचे पाहायला मिळत आहे. "जो पक्ष कुणबी समाजाला उमेदवारी देईल त्या पक्षाच्या मागे कुणबी समाज खंबीरपणे उभा राहिल," असा निर्धार दापोली विधानसभेतील कुणबी समाजाने केला आहे. 


रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यात कुणबी समाज एकवटला


या पार्श्वभूमीवर मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ व कुणबी समाजोन्नती संघ शाखा मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने 26 मार्च रोजी नालासोपारा इथे कुणबी समाज राजकीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपस्थित असलेल्या विविध संघटना आणि कुणबी समाजाच्या राजकीय तसेच सामाजिक नेत्यांनी 2024 च्या विधानसभेच्या दृष्टीने संदीप राजपुरे यांना पाठिंबा जाहीर केला असून आपण तशी मागणी राजकीय पक्षाकडे करणार असल्याचे मत व्यक्त केलं.


शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये आलेले संदीप राजपुरे स्वतः उमेदवारीसाठी उत्सुक 


संपूर्ण कोकणात निर्णायक मतं असलेल्या कुणबी समाजाला मागची 35 वर्ष राजकीय वनवास भोगावा लागला आहे. परंतु आता जो राजकीय पक्ष कुणबी समाजाला नेतृत्वाची संधी देईल, निवडणुकीसाठी उमेदवारी देईल, त्या राजकीय पक्षाच्या मागे दापोली विधानसभेतील सर्व कुणबी समाज उभा राहिल असा निर्धार करण्यात आला आहे. त्याच दृष्टीने दापोली विधानसभा मतदारसंघात 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राजकीय पक्षाकडून संदीप राजपुरे यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी करणार असल्याचं मत कुणबी समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केलं. आम्हाला आमचे प्रश्न मांडण्यासाठी आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आमचा हक्काचा उमेदवार हवा असं म्हणत सर्वांनी संदीप राजपुरे यांच्या नावाची घोषणा केली. 


कुणबी उमेदवार मिळावा यासाठी शरद पवारांची भेट घेणार; संदीप राजपुरे


याबाबत बोलताना संदीप राजपुरे म्हणाले की, मेळाव्यात आमचा ठराव झाला की जो पक्ष कुणबी समाजाला उमेदवारी देईल, त्या पक्षाच्या मागे कुणबी समाज ठामपणे उभा राहिल. कुणबी समाजाला उमेदवार मिळावा, यासाठी आमच्या विविध पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका सुरू आहेत. मी स्वतः राष्ट्रवादीचा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहे. मी स्वतः आमचे नेते शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार यांच्याशी समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी संपर्क करत आहे, बोलत आहे. आमच्या समाजात इतर पक्षांचे देखील काही नेते आहेत. ते त्यांच्या पक्षाच्या संबंधित नेत्यांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे जो पक्ष कुणबी समाजाला येत्या निवडणुकीत विधानसभेत उमेदवारी देईल, त्या पक्षाच्या मागे कुणबी समाज ठामपणे उभा राहिल."