Ratnagiri Barsu Refinery Protest: बारसू रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणाविरोधात कालपासून (सोमवार) आंदोलन सुरू आहे. अशातच सध्या या प्रकरणाला एक वेगळं वळण आलं आहे. रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरेंनीच सुचवलं होतं. ठाकरे मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) असताना त्यांनीच रिफायनरीच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलं होतं. 12 जानेवारी 2022 रोजीचं हे पत्र आहे. बारसूमध्ये 13 हजार एकर जमीन राज्य सरकारकडून (State Government) उपलब्ध करून देण्याची तयारीही पत्रातून उद्धव ठाकरेंनी दर्शवली होती. तसेच, यातील बहुतांश जमीन ओसाड असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नच येणार नाही, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. राज्य सरकारच्या या पत्रानंतरच केंद्र सरकारनं बारसूमध्ये रिफायनरी उभारण्यास परवानगी दिली होती. सध्या हे पत्र सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे रिफायनरीच्या मुद्द्यावर भूमिका मांडणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यातील काही प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी एकापाठोपाठ एक पत्रकार परिषदांचा धडाका लावला होता. पत्रकार परिषदांमधून ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली होती. पण सध्या बारसू रिफायनरीच्या संदर्भात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्या भूसंपादनात मोठ्या प्रमाणात पोलीस बळाचा वापर केला जातोय, असा आरोप ठाकरे गटाच्या वतीनं सातत्यानं केला जात आहे. परंतु, त्याचवेळी समोर आलेल्या पत्रामुळे पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंना शह दिल्याचं पाहायला मिळत आहे.
रिफायनरीसाठी नाणारऐवजी बारसूची जागा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना सुचवली होती. ठाकरेंनी पत्रात स्पष्ट नमूद केलं होतं की, बारसूची जागा पूर्णपणे ओसाड आहे. त्या जागेवर कोणतंही पूनर्वसन करण्याची गरज नाही. त्यामुळे ती जागा रिफायनरीसाठी वापरता येणं शक्य आहे, असंही ठाकरेंनी पत्रात नमूद केलं होतं. सध्या हे पत्र सोशल माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे आता बारसू विरोधात बोलणाऱ्या ठाकरे गटाची मोठी कोंडी झाल्याचं दिसून येत आहे.
पाहा व्हिडीओ : Uday Samant on Ratnagiri Refinery : रिफायनरी होण्यासाठी ठाकरेंनीच पत्र लिहिलं होतं ABP Majha
सोशल माध्यमांवर व्हायरल झालेल्या पत्रानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं त्यावेळी बारसूच्या जनतेला विश्वासात घेतलं होतं का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. अशातच आज उद्धव ठाकरे आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलणार? याकडे लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :