रत्नागिरी: अटकेच्या कारवाईला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे असं सांगत मी शरण जात नाही म्हणून सरकारने ही कारवाई केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केला. या सरकारला मला अटक करायचीच आहे, मला आरोपी बनवायचंच आहे असं सांगत आपल्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचंही ते म्हणाले. माझ्यावर गुन्हा दाखल केला ते ठिक आहे, पण यामध्ये माझी पत्नी आणि मुलालाही ओढलं जात आहे हे दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले. 


रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबीने आज साडे सहा तास चौकशी केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या बँक खात्याचीही तपासणी सुरू आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


शिंदे गटात जात नाही म्हणून कारवाई


एसीबीच्या चौकशीनंतर आमदार राजन साळवींनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ज्या दिवशी एकनाथ शिंदे 40 आमदारांना फोडून गेले, तेव्हापासून मी शिंदे गटात जाणार अशी अफवा उठवली जात आहे, पण मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. राजन साळवी हा कोकणातील लढवय्या आमदार आहे. राजन साळवी शरण जाणार नाही, तो आपल्यासोबत येत नाही म्हणून सरकारचे हे कृत्य आहे. 


माझ्याकडे सर्व हिशोब


अधिकारी जात नाहीत तोपर्यंत कार्यकर्ते जाणार नाहीत असं सांगत माझ्या घरात खोके सापडले का असा सवाल साळवींनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना केला. राजन साळवी म्हणाले की, 1982 ते 1992 पर्यंत मी सरकारी नोकरी करत होतो. त्यानंतर मी झेरॉक्सचे दुकान काढले. नंतर माझ्या नावावर एक बार सुरू करण्यात आला, तो आजही सुरू आहे. त्याचसोबत लोकप्रतिनिधी म्हणून मला पैसे मिळतात. या सर्वावर मी आयकर भरतो, संपत्तीची वेळोवेळी माहिती मी देतो. तसचे माझ्यावर जे काही कर्ज आहे त्याची माहिती मी दिलेली आहे. त्यामुळे या कारवाईला मी घाबरत नाही. 


अटक करा, पण पत्नीवर गुन्हा नोंद होणं हे दुर्दैवी


राजन साळवी यांच्यासोबत त्यांच्या पत्नीवर आणि मुलावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, मी एक लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे मला अटक करा, जेलमध्ये टाका नाहीतर काहीही नाही. पण माझ्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल केला हे दुर्दैवी, महाराष्ट्रामध्ये असं कुठेही घडलं नाही. मला आरोपी बनवायचंच आहे म्हणून ही चौकशी सुरू आहे. येत्या निवडणुकीमध्ये जनता अशांना त्यांची जागा दाखवेल. 


उद्धव ठाकरेंचा फोन


या कारवाईदरम्यान आपल्याला उद्धव ठाकरे यांचा दोन वेळा फोन आल्याचं राजन साळवी यांनी सांगितलं. शिवसेना आपल्या पाठिशी असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी आधार दिल्याचं ते म्हणाले. तसेच खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत, तसेच अनेक शिवसैनिकांनी आपल्याला फोन करून आधार दिल्याचं ते म्हणाले.


काय आहे राजन साळवी यांच्यावर आरोप?


ऑक्टोबर 2009 ते २ डिसेंबर 2022 पर्यंत 14 वर्षात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप साळवींवर ठेवण्यात आला आहे. साळवी यांच्याकडे 3 कोटी 53 लाख इतकी या बेहिशेबी मालमत्तेची रक्कम सापडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख रुपये इतकी आहे. बेहिशेबी मालमत्तेचा आकडा हा 118 टक्के इतका जास्त असल्याचा आरोप आहे. 


यापूर्वी राजन साळवी यांनी सहा वेळा एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयामध्ये हजर लावली होती. तसेच त्यांचा भाऊ, पुतण्या, वहिनी, स्वीय सहाय्यक यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. एसीबीने राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


ही बातमी वाचा: