Rajan Salvi ACB Enquiry: रत्नागिरी : ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांच्या रत्नागिरीतल्या (Ratnagiri) निवासस्थानी सकाळपासून एसीबीकडून झाडाझडती (ACB Enquiry) सुरू आहे. राजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबीचे अधिकारी सकाळी दहा वाजता पोहचले आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केली. चौकशीदरम्यान, उत्पन्नापेक्षा तब्बल 118 टक्क्यांनी संपत्ती जास्त असल्यामुळे राजन साळवींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी, त्यांची पत्नी आणि मुलाचाही उल्लेख करण्यात आला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, आमदार राजन साळवी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याच अनुषंगानं रत्नागिरी एसीबीकडून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार राजन साळवी यांनी अपसंपदा जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, राजन साळवी यांनी 3 कोटी 53 लाखांची अपसंपदा जमा केल्याचा आरोप एसीबीनं केला आहे. राजन साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख इतकी आहे. ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत या 14 वर्षात अपसंपदा  जमा केल्याचा आरोप राजन साळवींवर लावण्यात आला आहे. 


एसीबीकडून गुन्हा दाखल केल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी लेचापेचा शिवसैनिक नाही,परिणामांची पर्वा करत नाही असं राजन साळवी म्हणाले आहेत. माझ्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल झाला हे दुर्दैव आहे, शिंदे गटात न गेल्यानं परिणाम भोगावे लागणार असल्याचं राजन साळवींनी म्हटलं आहे. 


एसीबी चौकशीमुळे राजन साळवींच्या अडचणींत वाढ


राजापूरचे उद्धव ठाकरे समर्थक आमदार राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीमुळं निर्माण झालेल्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. लाचलुचपत विभागानं काही दिवसांपूर्वी राजन साळवींच्या कुटुंबीयांना नोटीस धाडून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलेलं. तसेच, काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांची चौकशी एसीबीकडून करण्यात आली होती. त्यावेळी अलिबागच्या एसीबी कार्यालयाच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील त्यांच्या हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं. 


राजन साळवींचं घर, हॉटेलचं एसीबीकडून मुल्यांकन 


राजन साळवी यांच्या मालमत्तेबाबत एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळं एसीबी चौकशी आणि त्यांना लागणारी माहिती यासाठी राजन साळवींनी आतापर्यंत तीनवेळा अलिबागच्या एसीपी कार्यालयात हजेरी लावली आहे. त्यानंतर एसीबीकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं. त्यात घर आणि हॉटेलच क्षेत्रफळ, एकूण जमिनीची किंमत, तसेच इंटरियर डिझाईनिंग अर्थात सजावटीसाठी करण्यात आलेला खर्च यांचं मूल्यांकन करण्यात आलं आहे. यासर्व प्रकाराबाबत बोलताना या साऱ्या गोष्टी राजकीय दबावापोटी सुरू असल्याचा आरोप राजन साळवींनी केला होता.