Raj Thackeray In Ratnagiri Lanja : 'पक्ष बांधणीच्या आड कुणी आल्यास त्याला तुडवा आणि पुढे व्हा, मी मुंबईतून वकिलांची फौज उभी करतो', लांजा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray News) यांनी कार्यकर्त्यांना हे आदेश दिले आहेत. येत्या काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा असा टाईट बांधतो की कुणी हात लावू शकणार नाही, असे देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले आहेत. ते लांजामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.
राज ठाकरे यांनी म्हटलं की, माझा संपूर्ण कोकण दौरा हा बांधणीचा दौरा आहे. बरं झालं आता मी आलो. पुढच्या काही दिवसात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी टाईट बांधणार आहे. मुंबई गेल्यावर वेगळ्या पक्षाचं आणि रत्नागिरीत आल्यावर वेगळ्या पक्षाचं काम करायची भानगड ठेवायची नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
जर पक्षवाढीच्या आड कुणी येत असेल तर त्यांना तुडवून पुढे जा. या सगळ्या लोकांना बाजूला सारुन तुम्ही पक्ष मोठा करा. घराघरात आपला पक्ष पोहोचला पाहिजे. महिलांमध्ये विश्वास निर्माण व्हायला हवा. महिलांना आपल्या पक्षात येऊन काम करायचं आहे, पण त्यांचा विश्वास आपण संपादन करायला हवा. तुम्हाला यासाठी सर्व प्रकारची मदत मुंबईहून पुरवली जाईल. मुंबईला मी गेल्यानंतर तुमच्याकडे माणसं येतील आणि तुमच्याशी बोलतील. पुढच्या काही दिवसात पक्षाचे काही कार्यक्रम आपण करणार आहोत. तुम्ही काळजी न करता पक्षवाढीसाठी सर्वांना बाजूला सारुन काम करा.
राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर
राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की, जानेवारीत मी पुन्हा कोकणचा दौरा करणार आहे. गेल्या दोन अडीच वर्षापासून महापालिकांच्या निवडणुका ठप्प झाल्या आहेत. पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे 2023 मार्च एप्रिल महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याचे ठाकरे म्हणाले. त्यावेळी मी पुन्हा कोकणात येणार आहे. मी केलेल्या सुचनांची अंमलबाजवणी योग्य होते की नाही हे पाहायलाला मी येणार आहे. त्यावेळी पुन्हा एकदा आपलं दर्शन होईल. त्यावेळी मला जे काही मांडायचे आहे ते मी मांडेन. कोकणासंदर्भात, महाराष्ट्राबाबत तसेच मराठी माणूस आणि हिंदुत्वासंदर्भात माझं म्हणणं मांडेन असं त्यांनी म्हटलं होतं.
रत्नागिरी शहरात जोरदार स्वागत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज रत्नागिरी शहरात पोहोचले. रत्नागिरी शासकीय विश्रामगृहावर राज ठाकरे यांचे जंगी स्वागत झालं. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्वागत केलं. उद्या राज ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरी जेलमधील कोठडीला भेट देऊ शकतात.
ही बातमी देखील वाचा
Raj Thackeray : राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरु, माझा महाराष्ट्र सैनिक निष्ठावान : राज ठाकरे