Taliye Landslide : इर्शाळवाडीत (Irshalwadi) घडलेल्या घटनेमुळे जुलै 2021 मध्ये रायगड (Raigad) जिल्ह्यातल्या तळीये (Taliye) गावात झालेल्या दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 22 जुलै 2021 रोजी कोंडलकरवाडी इथल्या वस्तीवर डोंगराचा एक भाग कोसळला. यामध्ये जवळपास 87 जणांना आपला जीव गमवावा लागला. मुसळधार पाऊस  सुरु असताना देखील या ठिकाणी बचाव कार्य सुरु होते. पण निसर्गापुढे कुणाचं काहीच चालत नव्हतं. अखेर मृतदेहांची होत असलेले विटंबना पाहता, बचाव कार्य थांबवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. त्यामुळे 87 पैकी काही मृतदेह हातीच लागले नाहीत. 


या घटनेला दोन वर्ष पूर्ण होत नाहीत तोच इर्शाळवाडीत दरड कोसळली. दरम्यान या घटनेनंतर तळीये गावच्या रहिवाशांच्या आठवणी देखील त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. तो दिवस त्याच दिवशी झालेला घटनाक्रम आठवल्यानंतर हे लोक आपल्या नातेवाईकांच्या आठवणीने भावूक होतात. अशा प्रकारचे दिवस कुणावरही येऊ नयेत अशी प्रार्थना ते देवाकडे करतात. 


तळीयेवासियांसाठी नवीन वसाहत बांधण्याचं काम अंतिम टप्प्यात


दरम्यान दोन वर्षानंतर तळीये गावच्या लोकांसाठी नवीन वसाहत बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही किरकोळ स्वरुपाचे काम असल्याने अद्यापही कोणीही या नवीन वसाहतीमध्ये वास्तव्यास गेलेले नाही. आम्ही आमची माणसं गमावली. त्यांच्यासोबत सर्व काही गेलं. त्यामुळे आता आम्हाला सरकारकडून फार काही अपेक्षा नाही. पण मागे राहिलेले लोकांसाठी मिळणारी घरे व्यवस्थित असावी अशीच माफक अपेक्षा तरी नागरिक व्यक्त करतात. पावसाचा जोर वाढल्यानंतर आजही अनेकांच्या डोळ्यासमोर 22 जुलै 2021 चा दिवस आठवतो आणि काळजात धस्स होतं. आजूबाजूच्या लोकांना देखील स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी यापैकी काही लोक नव्याने बांधलेल्या शाळेच्या इमारतीमध्ये राहतात. 


प्रशासन सरकारच्या सूचनांचं पालन करावं, तळीयेवासियांचं आवाहन


सध्या पुनर्वसन केलेल्या ठिकाणी 66 घरांचं काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच तळीयेवासी या ठिकाणी राहायला जातील. दरम्यान पावसाळ्यात प्रत्येकाने काळजी घ्यावी. प्रशासन किंवा सरकारच्या सूचनांचं पालन करावं. हलगर्जीपणा कोणीही करु नये. जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, असं आवाहन तळीयेवासी सर्वांना करतात.


इर्शाळवाडीवर दु:खाचा डोंगर


रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी गावावर बुधवारी रात्री दु:खाचा डोंगर कोसळला. मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या या वस्तीवर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 98 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. दुसऱ्या दिवशी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. मात्र चिखल आणि पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहेत.


हेही वाचा


Maharashtra Landslide : इर्शाळवाडीत दोन दिवसात 770 मिमी, तळीयेत 550 मिमी, दरड दुर्घटनांमध्ये पाऊस काळ बनला, किती मिमी बरसला?