रत्नागिरी :  कोकणात (Konkan News) घडणाऱ्या राजकीय घडामोडी या महत्त्वाच्या आहेत. मुख्यबाब म्हणजे राज्याच्या राजकारणात कोकणाला असलेलं महत्त्व देखील सध्या अधोरेखित होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात नेत्यांचे दौरे वाढले आहेत. शक्ती प्रदर्शन, सभा यांनी सध्या कोकणचं राजकीय आभाळ भरून गेलं आहे. मतदारसंघावर होत असलेले दावे - प्रतिदावे, शक्ती प्रदर्शन यांनी साऱ्या गोष्टी ढवळून निघत आहेत. कोकणात प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमवणे आणि दाखवण्याच्या मागे लागला आहे. त्यात दोन्ही राष्ट्रवादी देखील कुठं मागे नाहीत. शरद पवार आणि अजित पवार यांनी नुकताच कोकण अर्थात चिपळूण - संगमेश्वर या मतदारसंघाचा दौरा केला. या ठिकाणी असलेले विद्यमान आमदार शेखर निकम सध्या अजित पवार यांच्यासोबत आहेत. तसं म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कोकणात फार मोठी नाही. पण, चिपळूण - संगमेश्वर मतदारसंघातील उमेदवारी, विजय यासाठी सध्या दोन्ही बाजूनं जोर लावला जात आहे. अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर शरद पवार यांचा देखील दौरा झाला. पण, अजित पवार यांची पाठ फिरताच कोकणात त्यांना मोठा धक्का बसला आहे. दापोली नगरपरिषदेतील आठ पैकी सात नगरसेवकांनी थेट आपला वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 


वेगळी चूल मांडली; पुढे काय? 


उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी मांडलेली वेगळी चूल सध्या राजकीय चर्चेचा विषय आहे. कारण, हा धक्का अजित पवार यांच्यासह सुनिल तटकरे यांना देखील मानला जातो. तटकरे या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे. अद्याप तरी या नगरसेवकांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या घडामोडीकडे कोकणचं लक्ष लागून राहिलं आहे. अजित पवार यांना हा एक धक्काच मानला जात आहे. 


योगेश कदमांना आव्हान


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांनी घेतलेला हा निर्णय केवळ अजित पवार यांना तर महायुतीसाठी देखील धक्का आहे. शिंदेंच्या सेनेचे आमदार योगेश कदम यांच्याविरोधात भाजपनं दंड थोपटलेले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतलेली भूमिका त्यांची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते.


आदित्य ठाकरेंचा दौरा


पितृपक्ष संपताच आदित्य ठाकरे हे कोकणात येणार आहेत. यावेळी ते दापोली, मंडणगड, खेड या भागाचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याला महत्त्व आहे. अर्थात या दौऱ्यापूर्वी होत असलेल्या घडामोडींचा अर्थ लावताना सध्या कोकणच्या पारावर गजाल्या देखील रंगत आहेत. 


हे ही वाचा:


कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?