रत्नागिरी : सुड घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये' अशा आशयाचे बॅनर रत्नागिरी (Ratnagiri News) जिल्ह्यातील खेडमध्ये (Khed) काही दिवसांपूर्वी लागले होते. त्यामुळे रामदास कदम (Ramdas Kadam) आणि त्यांचे बंधु सदानंद कदम (Sadanant Kadam) यांच्यातील वादाची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आता सदानंद कदम यांनी पत्रक काढत 'माध्यमांसमोर मी सांगणार' अशा थेट इशाराच रामदास कदम यांना दिला आहे. येत्या आठ दिवसामध्ये सदानंद कदम याबाबतची पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेत कदम नेमकं काय बोलतात? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.
कोण मागे लागलंय कोकणातील पर्यटनाच्या? कोणाला माहितीच्या अधिकाराखाली मागवायला लावली माहिती? आपले राजकीय वलय वापरून गोळा केलेली ही यादी नंतर कोणत्या नेत्याने नतदृष्ट पुढाऱ्याला दिली? कोणाच्या ऑडिओ क्लिप जनतेनं ऐकल्या? असे सवाल देखील या पत्रकामधून विचारले आहेत. दापोली तालुक्यातील मुरूड येथील साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम अकरा महिन्यानंतर जामिनावर बाहेर आले आहेत. त्यानंतर त्यांनी बॅनर आणि आता थेट पत्रक काढत रामदास कदम यांना इशारा दिला आहे. त्यामुळे आता सदानंद कदम यांच्या पत्रकार परिषदेबाबत उत्सुकता वाढली आहे.
वादाची पार्श्वभूमी नेमकी काय?
स्थानिक पातळीवर मिळत असलेल्या माहितीनुसार, सदानंद कदम हे रामदास कदम यांचे धाकटे भाऊ. पण रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील मुरुड या समुद्रकिनारी असलेल्या साई रिसॉर्टने मागच्या दोन वर्षांमध्ये कोकणातीलच नव्हे तर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर आर्थिक अफरातफरीचे आरोप केले. रामदास कदम यांचे धाकटे बंधू असलेले सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. साई रिसॉर्टच्या प्रकरणांमध्ये सदानंद कदम यांना ईडीने अटक केली. जवळपास 11 महिने सदानंद कदम हे ईडी कोठडीमध्ये होते. त्यानंतर ते सध्या जामिनावर बाहेर आले आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये काही महिन्यांपूर्वी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे, रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे हा वाद आणखीन समोर आला होता.
सदानंद कदम यांच्या पत्रकार परिषदेची चर्चा
दरम्यान किरीट सोमय्या यांना नेमके कागदपत्रांची पूर्तता करतंय कोण? या संपूर्ण प्रकरणामागे नेमका कुणाचा हात आहे? अशी चर्चा आणि सवाल देखील विचारले जाऊ लागले होते. रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावरती केलेले आरोप यामुळे वातावरण ढवळून निघाले होते. शिवाय सदानंद कदम आणि रामदास कदम यांच्यामध्ये असलेल्या राजकीय वैर काही लपून राहिलेले नाही. सध्या रामदास कदम हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. तर सदानंद कदम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दोन्ही बंधूंमधील राजकीय वादाची चर्चा सध्या खेडमध्ये देखील सुरू आहे. ईडी कोठडीतून बाहेर आल्यानंतर सदानंद कदम यांनी वादग्रस्त अशा शाहीर रिसॉर्टचा अनधिकृत भाग कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून तोडला देखील आहे. पण त्यानंतर देखील हा वाद शमलेला नाही. अगदी काहीच दिवसांपूर्वी 'सुडाची भाषा बोलणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये' अशा आशयाचे बॅनर खेड शहरामध्ये लागले होते. त्यावेळी देखील रामदास कदम आणि सदानंद कदम यांच्यातील वाद टोकाला जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर केवळ काहीच दिवसांमध्ये सदानंद कदम यांनी एक पत्रक काढत थेट इशाराच दिला आहे. दोन पानी असलेल्या पत्रकामध्ये दिलेला इशारा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे सदानंद कदम यांच्या पत्रकार परिषदेची चर्चा सुरू झाली आहे.
कोण आहेत सदानंद कदम?
सदानंद कदम हे रामदास कदम यांचे धाकटे बंधू. शिक्षण दहावी नापास असून व्यवसाय आणि शेतीमध्ये रस असल्याचं सदानंद कदम सांगतात. साधारणपणे 2000 ते 2005 या कालावधीत मुंबई महानगरपालिका निवडणुक लढवल्याच्या आठवणी कदम खाजगीत बोलताना सांगतात. मला राजकारणात कोणताही रस नसून सर्वपक्षीयांशी माझे चांगले संबंध आहेत. मी शेतीत रमतो आणि व्यवसाय माझी आवड आहे. असं सदानंद कदम सांगतात. शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यासह त्यांची व्यवसायिक भागीदारी आहे. शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर सदानंद कदम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील जामगे हे त्यांचं मूळ गाव.
हे ही वाचा :