रत्नागिरी : मी खासदार, उदय रत्नागिरीचा आमदार आणि तुम्ही राजापूरचे आमदार असं मी तुम्हाला सांगत होतो. सामंत योग्य वेळी निर्णय घेतात, पण राजन साळवींनी योग्य वेळी निर्णय घेतला नाही असं राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी म्हटलं. भविष्यातील निवडणुका या राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली लढवायच्या आहेत असंही किरण सामंत म्हणाले. शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी पक्षांतर केल्यानंतर पहिल्यांदाच राजापूर मध्ये आले होते. यावेळी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार किरण सामंत आणि इतर पदाधिकारी तसेच राजन साळवी यांचे समर्थक हजर होते.


किरण सामंत म्हणाले की, "राजन साळवींनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावं यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. मी खासदार, उदय रत्नागिरीचा आमदार आणि तुम्ही राजापूरचे आमदार असं मी तुम्हाला बोललो होतो. राजन साळवींच्या घरच्यांशीही चर्चा केली होती. पण त्यांनी त्यावेळी निर्णय घेतला नाही. आता यापुढे आपण एकत्र काम करू." 


शिंदेंच्या बंडात राजन साळवी होते


किरण सामंत म्हणाले की, "राजन साळवी आणि आमचे जुने  संबंध आहेत. उदय सामंत पहिल्यांदा आमदार झाल्यामुळे राजन साळवी यांना त्यांचे जिल्हाध्यक्ष पद गमवावे लागले. आपण त्यावेळी प्रतिस्पर्धी होतो, शत्रू नव्हतो. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला त्यामध्ये राजन साळवी यांचा सहभाग होता. पण नंतर काहीतरी बिनसले. भविष्यातील निवडणुका तुमच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला लढवायच्या आहे. काही चांगले प्रकल्प येतील आणि त्याने कोकणचा विकास होईल."


राजन साळवी यावेळी म्हणाले की, "राजकारणात आजचा शत्रू उद्या मित्र होतो. एकनाथ शिंदे यांनी मला त्यांच्या पक्षात येण्यासाठी साद घातली होती. आपल्याला एकत्रपणे काम करायचा आहे. शिवसेना वाढवायची आहे. मागच्या काळात काय झालं यापेक्षा भविष्यात काय करायचे याचा शोध घेतला पाहिजे.  यापुढे हातामध्ये हात घालून काम केले पाहिजे. मतदारसंघात आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. त्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. आता किरण भैया तुम्हाला कळस चढवायचा आहे."


राजन साळवींचा शिंदे गटात प्रवेश 


लोकसभा निवडणुकीआधी राजन साळवींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यांच्या पत्नी, मोठे बंधू, इतर कुटुंबियांची एसीबी मार्फत चौकशीही झाली होती. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजापूरमधून राजन साळवी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या पराभवानंतर त्यांनी आता शिंदे गटाची वाट धरली आहे. कोकण हा कायम शिवसेनेला साथ देणारा भाग. राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंऐवजी एकनाथ शिंदेंच्या पारड्यात वजन टाकलं. या भागात एकनाथ शिंदेंनी आपली पकड मजबूत केली आहे. 


 



ही बातमी वाचा: