Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेत कोकणात झालेल्या डॅमेजनंतर माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लवकरच कोकणचा दौरा करणार आहेत. कोकणात नवीन लोकांना सोबत घेऊन संघटना उभी करा, अशा सूचना देखील उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत. वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना वैभव नाईक भेटले. यावेळी त्यांनी माध्यमांसोबतही संवाद साधला. एसीबी चौकशीची लढाई एकटा लढणार, या लढाईसाठी कुठल्याही पक्षात जाणार नाही, असं वैभव नाईक यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच माझ्यावर कुठलाही दबाव नाही...मी उद्धव ठाकरेंसोबत राहणार, ही माझी भूमिका स्पष्ट आहे, असंही वैभव नाईक यांनी सांगितले.


वैभव नाईक नेमकं काय म्हणाले?


उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर वैभव नाईक म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत आज पहिलीच भेट झाली. मी कुठल्याही प्रकारे नाराज नाही. मी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत होतो, आजही आहे आणि उद्याही राहील. पराभवानंतर मी उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच भेट घेतली... एसीबीची चौकशी सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी फोनवर माझ्याशी संपर्क साधला होता, अशी माहिती वैभव नाईक यांनी दिली. 


एकनाथ शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' मोडून काढायला उद्धव ठाकरे मैदानात-


शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगरद्वारे ठाकरे गटाचे अनेक नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहे. याचदरम्यान आता उद्धव ठाकरे देखील मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांनी कोकणातील सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला . पुन्हा एकदा उद्धव ठाकरे कोकणचा दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं नवीन लोकांना सोबत घेऊन आपण काम करूया..जुन्या शिवसैनिकांना पुन्हा सोबत घेऊन आपल्याला विश्वास निर्माण करून संघटना उभी करायची आहे. उद्धव ठाकरे सगळ्यांशी संपर्क साधत आहेत. काही लोक सत्ता आमच्याकडे नसल्याने जात असतील. पण जे सत्तेच्या सोबत आहेत ते सुद्धा काही लोक आमच्यासोबत मिळतील. त्यानूसार आम्ही संघटना पुन्हा एकदा उभी करू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 


भास्कर जाधवसारखा लढवय्या नेता कोकणात- वैभव नाईक


एसीबीची चौकशी माझी दोन अडीच वर्षापासून सुरू आहे.एसीबीची चौकशी ही लढाई माझी एकट्याची आहे आणि मी एकटा लढणार आहे. त्या लढाईसाठी मी कुठलाही पक्ष सोडणार नाही. भास्कर जाधवसारखा लढवय्या नेता कोकणात आहे आणि ते निश्चित नाराज नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. भास्कर जाधव कुठल्याही प्रकारे नाराज नाही ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत काम करत राहतील. माझ्यावर कोणी दबाव टाकलेला नाही आणि मी जी भूमिका मांडलेली आहे, असं वैभव नाईक यांनी स्पष्ट केलं. 


संबंधित बातमी:


Maharashtra Politics Vaibhav Naik: कोकणात उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; सिंधुदुर्गात पडला आणखी एक राजीनामा


वैभव नाईक शिवसेनेत येणार- भरत गोगावले, VIDEO: