Ratnagiri News: रत्नागिरीच्या (Ratnagiri News) जिद्दीच्या ग्रुपला नेहमी नवनवीन सुळके जणू सादच घालत असतात. अशाच दोन सुळक्यांची माहिती जिद्दीचे लिड स्लायंबर अरविंद नवेले आणि जिद्दीचे मेंबर उमेश गोठिवरेकर यांना गेल्या आठवड्यामध्ये मिळाली. सिंधुदूर्ग जिल्ह्यामधील आंबोलीजवळ असणाऱ्या चौकुळ गावाजवळ कुडू आणी पायली या नावाचे दोन सुळके आहेत. या सुळक्यांवर आजपर्यंत कोणीही चढाई केलेली नसल्याचं समजल्यावर कोणत्याही परिस्थितीत या सुळक्यांवर चढाई करायची, असं यांनी ठरवून लगेचच या सुळक्यांची जिद्दी टीमनं रेकी करून या ठिकाणी जाण्याचा प्लॅन केला. 


एखाद्या सुळक्यावर चाढाई करण्यापूर्वी तेथील भौगोलीक परिस्थिती, साधन सामुग्रीची माहिती, अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितींची तयारी, चढाई करण्यात येणाऱ्या सुळक्यांच्या दगडांची शास्त्रशुद्ध माहिती, त्या ठिकाणी जाण्याच्या वाटा, चढाईसाठी जाणाऱ्या टिमच्या सुरक्षिततेची पूर्ण खात्री आणि तयारी, पाण्याची व्यवस्था इत्यादी अनेक गोष्टींची खात्री आणी पूर्ण प्लॅन केल्याशीवाय अशा ठिकाणी जाता येत नाही. याची तयारी करून जिद्दीची टिम शनिवारी 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी 8 वाजता या सुळक्यांवर चाढाई करण्यासाठी निघाली. दुसरी टिम रात्री एक वाजता रत्नागिरीवरून निघाली. आदल्या दिवशी अरविंद नवेले हे रायगड किल्ल्यावर रत्नागिरीच्या 118 जणांना एकावेळी घेऊन गेले होते. ते रात्री 1 वाजता रत्नागिरी येथे येऊन त्यांच्यासोबत दुसरी टिम रत्नागिरीवरून 1 वाजता निघाली. कोणतंही धेय्य गाठायचं असल्यास त्यासाठी अत्यंत खडतर प्रवास आणि मनाची तयारी करावी लागते. एखाद्या सुळक्यांवर ते सुद्धा पहिल्यांदा चढाई करताना मेहनत आणी तुमच्यातील जिद्दीचा कस सागतो. 




या चौकुळ गावाजवळ असणाऱ्या या कुडू आणि पायली या नावाच्या सुळक्यांवर चढाई करताना जिद्दीच्या मेंबरच्या चिकाटी आणी मेहनतीचा कस लागला. कुडू आणि पायली ही नावं फारपूर्वी धान्य मोजण्यासाठी वापरात येणाऱ्या साधनांची होती. प्रामुख्यानं भात मोजण्यासाठी या कुडू आणि पायली नावाच्या साधनांचा वापर केला जात असे. मग ही नाव या सुळक्यांना कशी पडली? याचा एक रंजक इतिहास आहे. या सुळक्यांच्या कडेला असणाऱ्या एका कातळ भिंतींना साधारण 20 ते 25 फुटांची बांबुची किंवा लाकडांची शिडी लावून पूर्वीची लोकं खाली उतरून या सुळक्यांच्या कडेनं पुढील बाजूला खाली असलेली त्यांची शेती करण्यासाठी जात असतात. भर पावसाळ्यात या ठिकाणांहून जाणं अत्यंत धाडसाचंच म्हणावं लागेल. डोंगरांच्या पायथ्याशी शेती करून नंतर त्यातून पिकणाऱ्या तांदूळ, नाचणी इत्यादी पुन्हा याच मार्गानं घरी घेऊन जाणं देखील ही पुर्वीची लोक करत असत. आज त्या ठिकाणी साध जाण्याच धाडस कोणी करू शकत नाही. या धान्यांच्या नेण्यावरून आणि त्याच्या शेतीवरून या धान्यांच्या मोजण्याच्या साधनांवरून पूर्वीच्या लोकांनी या दोन सुळक्यांना कुडू आणि पायली ही नावं दिली. ती आजपर्यंत प्रचलित देखील आहेत. 


या सुळक्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी 40 फुटांची घसरण आणि 25 फुटांची सरळ भिंत रॅपलिंग करत खाली उतरावं लागतं. याच मार्गानं परत येताना क्लायबिंग करत यावं लागतं. या सुळक्यांवर चढाई करताना ड्रिल मशिननं होल मारून बोल्डिंग करत चढायचं ठरलं. परंतु यामध्ये अडचणी निर्माण झाल्यानं पिटॉन मारत या सुळ्यांवर जिद्दीचे लिड क्लायंबर अरविंद नवेले यांनी प्रथम यशस्वी चढाई केली. त्यांच्यासोबत कायम विविध मोहिमेमध्ये सहभागी असणारी आणि त्यांना सपोर्ट देणारे सेकंड लिड क्लायंबर प्रसाद शिगवण यांनी या सर्वांच्या सुरक्षितेची काळजी घेतली. यांच्या सोबतच अजस्त्र असे हे दोन सुळके रत्नागिरीच्या उमेश गोठिवरेकर, सतिश पटवर्धन, आशिष शेवडे, उमेश ठाकूरदेसाई, ओंकार सागवेकर चिपळूणचे आकाश नाईक यांनी यशस्विरित्या सर केले. या मोहिमेत सहभागी होणारी सर्व तरूण मंडळी 20 ते 38 वयोगटातील होती. मात्र यामध्ये 9 वर्षाच्या सृजन पटवर्धन यानं त्याच्या बाबांसोबत स्वतः या सुळक्यावर चढाई केली. वयाच्या 53 व्या वर्षी उमेश गोठिवरेकर यांनी चढाई करणं हे या जिद्दी टिमचं खास वैशिष्ठ आहे. 


तुमच्यात जर जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर कोणतंही अवघड काम शक्य करता येईल, हे या दोघांनी आज सिद्ध केलं आहे. जिद्द टिमच्या अनेक मोहिमांमध्ये कु. सुजन पटवर्धन आणि उमेश गोठिवरेकर हे नेहमी सहभागी असतात. या दोन सुळक्यांपैकी कुडू सुळक्याच्या दगडांची परिस्थिती पहाता ते ठिसूळ असल्यानं त्यावर फक्त अरविंद नवेले यांनी एकट्यांनीच चढाई केली आणि पायली सुळक्यावर सर्वांनी चढाई केली. या चाढाईत सर्व सुरक्षीत आणि अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला होता. या मोहिमेत सर्वांना यशस्विरित्या नेणे आणि सुरक्षीत आणण्याचे काम अरविंद नवेले,सतिष पटवर्धन व प्रसाद शिगवण या जिद्दीच्या उत्कृष्ट क्लायंबरनी केले.कोणत्याही मोहिमेत एक बॅकअप इमर्जन्सी प्लॅन तयार ठेवायला लागतो आणि त्या टिमला सपोर्ट करावा लागतो.यासाठी जिद्दी माउंटेनेरिंगच्या इतर लोकांनी रत्नागिरीमध्ये बसून पूर्ण सपोर्ट केला होता. या यशस्वी मोहिमेसाठी माउंटेनेरिंग क्षेत्रामधून या टिमचे कौतुक होत आहे. या सुळक्यांची दगडांची स्थिती पहाता अन्य कोणी यावर चढाई करण्याचा किंवा कोणत्याही अत्याधुनिक साधनांशिवाय चढाई करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असं जिद्दी टिमनं आवाहान केलं आहे.