Raj Thackeray:  प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांबाबत कोकणातील वातावरण तापत असताना दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रिफायनरी ( Konkan Refinery Project) बाबत भूमिका स्पष्ट केली आहे. विनाशकारी प्रकल्प कोकणात नको मात्र राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणे हे देखील योग्य नाही, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.  रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 


राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी येथे त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. या राज ठाकरे यांनी म्हटले की, कोकणात ज्या अडीअडचणी आहेत त्याबद्दल कोकणवासियांनी राग व्यक्त केला पाहिजे. पण, हा राग दिसून येत नाही. गोवा महामार्ग कितीतरी दिवस रखडला असल्याचे त्यांनी म्हटले. विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. मात्र, राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणे हे देखील योग्य नाही असेही त्यांनी स्पष्ट म्हटले. 


एक दोन प्रकल्प महाराष्ट्रातून दूर गेले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. कोकणातल्या जमिनी विकत घ्यायला भुरटे येतात. त्यावेळी खरबदारी घ्यायला हवी, एक गठ्ठा हजारो एकर जमीन जातेय,  बाहेरची मंडळी जमिनी विकत घेतात, तेव्हा संशय येत नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मतदानातून कोकणी जनतेने राग व्यक्त करायला हवा. मात्र, तो होत नसल्याचे ही राज यांनी म्हटले.


कोकणात मनसेला संधी


कोकणात मनसेसाठी सकारात्मक वातावरण असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. कोकणातील पक्ष संघटना आगामी काळात मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जानेवारीत कोकणात दोन सभा घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. एक सभा कुडाळ आणि दुसरी सभा चिपळूण किंवा रत्नागिरी येथे होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


ज्यांना चित्रपटाबाबत आक्षेप असतील त्यांनी लेखकांशी बोलावे


कोणीही उठून इतिहासावर बोलणं योग्य नाही. कागदपत्रांच्या आधारे वस्तुस्थिती तपासली पाहिजे असे राज ठाकरे यांनी म्हटले. इतिहास हा रुक्ष आहे तो सिनेमात रंजक करून दाखवला तरच लोक पाहतात. इतिहासाला डाग लागू नये स्फुर्ती मिळावी या साठी चित्रपट तयार केले जातात. ज्यांना आक्षेप आहेत, त्यांनी 
चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधला पाहिजे. फक्त विरोध करू नये असेही राज ठाकरे यांनी म्हटले.