Ratnagiri Rain : सध्या राज्यात पावसानं दडी मारली आहे. राज्यातील काही ठिकाणीच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे. दरम्यान, कोकणातील शेतकरी सध्या चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील भाताचे पीक धोक्यात आलं आहे. शेतजमीन ताठ बनली असून, पाणथळीच्या पिकांची पाती पिवळी पडू लागली आहेत.
दिवसा कडक ऊन, भात शेतीवर परिणाम
रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पाठ फिरवलेल्या पावसाचा अजूनही ठाम पत्ता नसल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. सध्या दिवसा कडकडीत पडणाऱ्या उन्हानं सर्वत्र होरपळ सुरु झाली आहे. त्याचा परिणाम जोमावर असलेल्या भात शेतीवर होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. कातळसड्यावरील शेतीबरोबर पाणथळ जागेतील शेतीमध्येही पाणी अभावी कडकडीत जमीन होऊ लागल्यानं भात शेतीची पाती पिवळी पडू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील भात पीक धोक्यात आली आहेत.
भाताची पीक पडू लागले पिवळे
सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. कारण भात पिकांसाठी शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे. मात्र, सध्या पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. कारण पाण्याअभावी भाताचे पीक पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळं सध्या पिकाला पावसाची आवश्यकता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यात गेल्या दहा दिवसात शून्य टक्के पावसाची नोंद झाली आहे. दहा दिवसापासून जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. कारण पिक चांगलं येण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची गरज आहे. कोकणात पावसानं पाठ फिरवली आहे. तसेच राज्यात सुद्धा पावसानं दडी मारली आहे. तुरळक ठिकाणीच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे.
जून महिन्यात पावसानं हुलकावणी दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै महिन्यात राज्यांच्या बहुतांश भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कलीत झालं होते. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रत्यांचही मोठं नुकसान झालं आहे. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील जवळपास आठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे. सध्या विविध ठिकाणी पंचनामे सुरु असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: