Chiplun Rain Updates: रत्नागिरीतील (Ratnagiri News) जोरदार पावसामुळे वाशिष्टी नदी (Vashishti River) आणि खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहू लागल्या आहेत. नदीपात्रातील पाणी चिपळूणच्या काही सकल भागात शिरंल आहे. वाशिष्टी आणि जगबुडी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चिपळुणात रात्रीच एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. तसेच, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. पु़ढचे तीन ते चार दिवस अशी स्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.  


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या मुसळदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


वाशिष्ठी नदीपात्रात न जाण्याचा नागरिकांना इशारा


रत्नागिरीतील कोळकेवाडी धरण आणि धरण परिसरात काल रात्री 8 वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सद्यस्थितीत महाजेनकोचे चारपैकी तीन युनिट चालू असल्यामुळे वक्रदारद्वारे सांडव्यावरुन पाणी विसर्ग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोलादवाडी नाला आणि वाशिष्ठी नदी पात्रालगत नागरिकांना न जाण्याचा इशारा देण्यात यावा, असे पत्र कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग आलोरेचे उपविभागीय अभियंता यांनी कोळकेवाडी, नागवे, आलोरे, पेंढाबे, खडपोली, पिंपळी खु., पिंपळी बु., सती आणि खेर्डी सरपंचांना पाठवलं आहे.


वाशिष्ठी नदीच्या पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आढावा


कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्यानं धोकापातळी  गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागांत पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. हवामान खात्यानं येत्या चार दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीनं कराव्यात, मदतकार्य तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 


राज्यात पावासाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून  वाढला आहे. हवामान खात्यानं येत्या चार दिवसांत कोकणासह राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे चिपळूण शहरातील सखल भागांत पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे, तसेच वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. वाशिष्ठीचं पाणी धोकापातळीपर्यंत वाढलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे तातडीनं स्थलांतर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पूरामुळे बाधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तातडीनं पुरवठा करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी वाशिष्ठी नदीला आलेल्या पुरामुळे चिपळूणमध्ये मोठी वित्तहानी झाली होती. त्यावेळी वाशिष्ठी नदीच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी विशेष निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची माहितीसुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.