मुंबई : झेंड्याचा रंग भगवा केल्यानंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा राग आवळला आहे. आज मनसेच्या अधिवेशनात त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर मुस्लिम देशातून हाकलून देण्याची मागणी केली. यासाठी केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचे देखील ते म्हणाले. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही, असे ते म्हणाले.


आज सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे ह्या देशातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर मुस्लिम ह्या देशातून बाहेर हाकलून देण्याचा. आणि ह्यासाठी केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असे ते म्हणाले. बांगलादेश आणि पाकिस्तानी घुसखोर मुसलमानांना देशाबाहेर हाकलून द्यावं ह्यासाठी येत्या 9 फेब्रुवारीला मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चा काढणार आहे. सीएए आणि एनआरसी विरोधात निघणाऱ्या मोर्चांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मोर्चाने उत्तर देणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं. जे देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे यावेळी म्हणाले की, आज राज्यात बाहेरच्या देशातून आलेले मौलवी जाऊन देशविघातक कारवाया करत आहेत अशी माझी माहिती आहे आणि ह्या विषयावर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे. सीएए, एनआरसी वर अचानक हजारोंचे मोर्चे निघायला लागले आणि हे मोर्चे का निघत आहेत तर कलम 370 असो व राममंदिराचा सुप्रीम कोर्टाचा निकाल असो त्यावरचा राग रस्त्यावर मोर्चे काढून निघत आहे. नरेंद्र मोदी जेव्हा चुकले तेव्हा मीच त्यांच्यावर टीका केली पण जेंव्हा त्यांनी चांगली गोष्ट केली तर त्यांचं अभिनंदन करणारा मीच होतो. कलम 370 असो की राममंदिराचा विषय असो त्यांचं अभिनंदन करणारा मीच होतो असं ते म्हणाले.


ते म्हणाले की, माझं केंद्र सरकारला सांगणं आहे की समझौता एक्स्प्रेस बंद करा. आज देशात उभे राहिलेले मोहल्ले हे देशाला त्रास देणार आहेत. उद्या जर युद्ध झालं तर सैन्याला बाहेरच्या नाही तर आतल्या शत्रूंशीच लढावं लागेल. हिंदूंच्या सणांच्या विरोधात जेव्हा कोणी बंदी आणायचा प्रयत्न केला तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच उभी राहिली आहे. आता सरसकट कुणालाच माफी नाही, जर इथे येऊन धिंगाणा घातलात तर मी तुमच्या अंगावर जाईन. रझा अकादमीच्या आंदोलकांनी पोलीस भगिनींवर हात घातला तेंव्हा त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच होती, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या