मुंबई : ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य सक्रीय राजकारणात सहभागी झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग झालं आहे. अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांच्या लॉन्चिंगची घोषणा केली. यावेळी अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे, पत्नी मिताली ठाकरे, बहिण उर्वशी, आजी कुंदाताई ठाकरे उपस्थित होत्या. परंतु राज ठाकरे मात्र मंचावर उपस्थित नव्हते. ते एका खोलीत बसून हा प्रसंग पाहत होते.


अमित राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड करत आहोत, अशी घोषणा बाळा नांदगावकर यांनी केली. त्यानंतर मनसेच्या विद्यार्थी सेनेतर्फे शाल आणि तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमस्थळी टाळ्यांच्या कडकडाटात एकच जल्लोष झाला. नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी शिक्षणाचा ठराव मांडला. अमित यांच्या लॉन्चिंगची घोषणा झाल्या, त्यांच्या आई तसंच पत्नीचे डोळे पाणावले होते.

अमित राज ठाकरे यांचा परिचय
हँडसम् आणि रावडी लूकमुळे अमित ठाकरे मनसेच्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये फेमस आहेत. इन्टाग्राम, फेसबुकवर यांसारख्या सोशल मीडियावर अकाऊंटवर ते प्रचंड अॅक्टिव असतात. 24 मे 1992 रोजी जन्मलेले अमित ठाकरे 27 वर्षांचे आहे. मुंबईतील डीजी रुपारेल कॉलेजमधून ग्रॅज्युएट असलेले अमित ठाकरेंनी आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलं आहे. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या स्वभावात मोठा फरक असला तरी ते काही गोष्टींमध्ये वडिलांच्या मागे नाहीत. अमित ठाकरेही एक चांगले व्यंगचित्रकार असून स्केचिंगही करतात. ते फुटबॉल प्रेमी असून स्वतः फुटबॉल खेळतात. प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डीनो भारतात आणण्यासाठी अमितचा मोठा वाटा होता.

स्पेशल रिपोर्ट: राजकारणातील नवे ठाकरे

आजारावर मात
2017 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकांच्या काळात अमित ठाकरे आजारी होते. मात्र दुर्धर आजारावर मात करुन ते पुन्हा नव्याने उभे राहिले आणि राजकारणात सक्रीय झाले.

मिताली बोरुडेसोबत लग्न
अमित ठाकरे यांचा गेल्या वर्षी 27 जानेवारी रोजी विवाह झाला होता. मिताली बोरुडे या मैत्रिणीसोबत त्यांनी लगीनगाठ बांधली. अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. मिताली बोरुडे ही फॅशन डिझायनर आहे. प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची ती कन्या आहे. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

मनसेचा ध्वज बदलला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर आपला ध्वज बदलला आहे. मुंबईत गोरेगावमधील नेस्को मैदानात मनसेचं पहिलं राज्यव्यापी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या ध्वजाचं अनावरण केलं. मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा आहे. तसंच झेंड्यात पूर्णपणे भगव्या रंगाला स्थान देण्यात आलं आहे. स्थापनेनंतर तब्बल 14 वर्षांनी मनसेच्या ध्वजाचा रंग आणि राजकारण दोन्हीही बदललं आहे. दरम्यान राज ठाकरे आज संध्याकाळी पक्षाचा अजेंडाही स्पष्ट करणार आहेत.