मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यव्यापी अधिवेशन मुंबईत पार पडत आहे. या अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं.अधिवेशनाचं उद्घाटन झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या ध्वजाचं अनावरण केलं. मनसेच्या नव्या भगव्या झेंड्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. मनसेच्या झेंड्याच्या भगवेकरणामागे राष्ट्रवादीच्या शरद पवारांचं डोकं असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केला आहे.


हिंदू मतांच्या विभाजनासाठी शरद पवार चाणाक्षपणे मनसेचा वापर केला. शरद पवारांनी राज ठाकरेंचा वापर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केला, असा गंभीर आरोप हाके यांनी केला. दुर्दैवाने शिवसेना हिरवी झाली, म्हणून मनसे भगवी होत आहे. हिंदूधर्म किंवा महाराष्ट्र धर्माच्या नावाखाली राज ठाकरेंना शक्ती देण्याचं काम शरद पवार करत आहेत. मात्र यामुळे भाजपचं नुकसान होईल, असं कुणाला वाटत असेल ते चुकीचे असल्याचा टोलाही गणेश हाके यांनी लगावला आहे.


मनसेचा झेंड्याच्या रंग बदलण्याचा प्रयोग फेल जाणार आहे. भाजपला वैचारिक गोंधळ असलेले तकलादू मित्र नकोत. देशात आणि राज्यात आम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठे होऊ शकतो. मनसे आणि भाजप यांच्या कामात मतभेद आहेत. मनसेने आमचा विचार स्वीकारला तर मैत्रीबाबत विचार करू, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे, याची आठवण हाके यांनी करुन दिली. वंचित बहुजन आघाडी भाजपची टीम बीचा प्रयोग करण्याची गरज नाही. मात्र मनसे राष्ट्रवादीची बी टीम म्हणून काम करत आहे, असा आरोप हाके यांनी केला.


कसा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवा झेंडा?


मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा आहे. तसsच झेंड्यात पूर्णपणे भगव्या रंगाला स्थान देण्यात आलं आहे. स्थापनेनंतर तब्बल 14 वर्षांनी मनसेच्या ध्वजाचा रंग आणि राजकारण दोन्हीही बदललं आहे. दरम्यान राज ठाकरे आज संध्याकाळी पक्षाचा अजेंडाही स्पष्ट करणार आहेत.


अमित ठाकरे यांचं राजकारणात लॉन्चिंग


आजच्या मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पूत्र अमित ठाकरे यांचं राजकारणात लॉन्चिंग करण्यात आलं. अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांच्या लॉन्चिंगची घोषणा केली. यावेळी अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे, पत्नी मिताली ठाकरे, बहिण उर्वशी, आजी कुंदाताई ठाकरे उपस्थित होत्या. परंतु राज ठाकरे मात्र मंचावर उपस्थित नव्हते. ते एका खोलीत बसून हा प्रसंग पाहत होते.


संबंधित बातम्या