मुंबई : मनसेच्या राज्यव्यापी आंदोलनात नव्या झेंड्याचं अनावरण राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र मनसेच्या नव्या भगव्या झेंड्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी निर्माण केलेल्या राजमुद्रेचा कुठल्याही पक्षाने राजकारण करण्यासाठी वापर करु नये, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मूळ पहिला झेंडा हा चार रंगाचा होता. जातीच्या नावावर मत मागण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचा वापर केला गेला. मात्र त्यात यश आलं नाही. राजकारणात चढ-उतार होत असतात, मात्र मतासाठी जाती-धर्माचा उपयोग करून झेंड्याचा रंग सुद्धा (सरड्यासारखे) सतत बदलतात, असे रंग राजकारणात बदलता येत नाही. मनसेने आता नवीन भगवा झेंडा निर्माण करून त्यावर राजमुद्रा छापली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही राजकारण करण्याचे साधन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी राजमुद्रेची निर्मिती केलेली आहे. त्या राजमुद्रेचा वापर कुठल्याही पक्षांनी राजकारण करण्यासाठी करू नये, भूमिका अशी संभाजी ब्रिगेडची आहे. म्हणून मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा छापण्यास संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध आहे.


मनसेचे समतेचा भगवा झेंडा घेतला असेल तर स्वागत करु. आम्ही भारतीय संविधान व लोकशाही मानणारे लोक आहोत. मात्र राजमुद्रा वापरणं हे महाराष्ट्रातील शिवप्रेमी व संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही. भगवा झेंडा हा समता आणि बंधुतेचा प्रतिक असून तथागत बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज शांतीचे सुद्धा प्रतीक आहे. पहिल्या मूळ झेंड्यात जातीचे रंग वापरले गेले, आता या भगव्या रंगाच्या झेंड्याचं मनसे करणार काय? हा प्रश्न महाराष्ट्र समोर पडलेला आहे. देशाचे व राज्याचे निवडणूक आयोग, छत्रपती यांचे वंशज आणि महाराष्ट्र सरकार यांच्याकडे मनसेच्या झेंड्याविरोधात व झेंड्यावरील राजमुद्रेविरोधात संभाजी ब्रिगेड तक्रार करणार आहे. राज्यकारभाराची निशाणी झेंड्यावर मनसेला वापरता येणार नाही, अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे. यासाठी मनसे विरोधात संभाजी ब्रिगेड भविष्यात तीव्र संघर्ष करणार आहे, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.


कसा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवा झेंडा?


मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा आहे. तसेच झेंड्यात पूर्णपणे भगव्या रंगाला स्थान देण्यात आलं आहे. स्थापनेनंतर तब्बल 14 वर्षांनी मनसेच्या ध्वजाचा रंग आणि राजकारण दोन्हीही बदललं आहे. दरम्यान राज ठाकरे आज संध्याकाळी पक्षाचा अजेंडाही स्पष्ट करणार आहेत.



संबंधित बातम्या