Shivrajyabhishek Din 2023: यंदा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे.  तिथीनुसार राज्यभिषेक सोहळा साजरा होण्यापूर्वी रायगडावर आज शिरकाई मंदिरात पूजा करण्यात आली शिवभक्तांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर जगदिश्वराच्या मंदिरात आणि वाडेश्वर मंदिरात विधिवत अभिषेक करण्यात येणार आहे. शिवभक्तांचा उत्साह पाहता यंदा रायगड दुमदुमणार असल्याचं चित्र आहे.  


छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. शुक्रवारी (2 जून) रोजी सकाळी 8.30 वाजता या सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. या सोहळ्यात आजपासून (1 जून) रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  मंगळवार, 6 जून रोजी देखील सकाळी 8.30 वाजता रायगड किल्ल्याच्या परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचाड येथे 1 ते 6 जून या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाहने या ठिकाणी ठेवल्यानंतर शिवभक्तांना ने-आण करण्यासाठी वाहनतळ ते पाचाड नाका या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत 150 बसेस उपलब्ध करण्यात येत आहेत. 


शिवभक्तांच्या स्वागतासाठी तयारी


गडाच्या पायथ्याशी राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी साडेतीन हजार वाहने या ठिकाणी पार्किंग करून ठेवता येणार आहे. 


उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर 10 हजार लिटर आणि गडाच्या पायथ्याशी 40 हजार लीटर पाणीसाठा करण्यात आला आहे. 


शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 24 वैद्यकीय सेंटर्स तैनात केली जाणार आहेत. यात गडावर सहा, पायऱ्यांवर सहा तर पायथ्याशी सात आणि वाहनतळावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत.


गडाच्या पायथ्याशी अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सोयीसाठी पाचाड शिवसृष्टी परिसरात 3 हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत. गडावर आणि पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.


गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग उपलब्ध असणार आहेत. रोप-वे मार्ग हा निमंत्रितांसाठी मर्यादित राहणार आहे.


 रायगड किल्ले परिसरात जवळपास 2  हजार पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येतील


याशिवाय पायरी मार्गाने रात्री गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पायरीमार्गावर पुरेसे पथदिवे लावण्यात आले आहेत.


हे ही वाचा :


शिवरायांची वाघनखं ब्रिटनमधून परत आणणार, 6 जून संकल्प आणि शपथ दिवस: सुधीर मुनगंटीवार