Raigad Politics : रायगड जिल्ह्यात सध्या महायुतीमध्ये बिनसल्याचे सूर उमटत आहेत. रायगड जिल्ह्यात विधानसभेचे सर्वचे सर्व सात आमदार हे महायुतीचे आहेत. मात्र जसजशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसतसे महायुतीतील अंतर्गत वाद बाहेर येताना पहायला मिळत आहेत. कर्जत खालापूर तसेच अलिबाग मुरूड या मतदारसंघांमध्ये तो वाद आतापासूनच उफाळून आल्याचं चित्र आहे.


कर्जत खोपोली मतदारसंघातील वाद 


कर्जत खोपोली खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांची सुद्धा आमदारकीची पहिलीच टर्म आहे. शिवसेनेच्या जोरावर त्यांना त्यांच्या मतदारसंघात जनतेने निवडून दिले त्यावेळी एकच ठाकरेंची शिवसेना होती. मात्र सेनेची दोन गटात विभागणी झाल्यानंतर महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघात सुद्धा राजकीय कलह पाहायला मिळाला. 


राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि सध्या भाजपमध्ये गेलेले सुरेश लाड यांचा त्यांनी 18 हजार 46 मतांनी पराभव करत विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली होती. त्यांनतर राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडली आणि सुरू झाला वादाचा दुसरा अंक. एकेकाळी शत्रू असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आता महायुतीमध्ये सामील आहेत. मात्र विधानसभेच्या निवडणुका पाहता कोणाला उमेदवारी मिळणार यावरून चुरस सुरू आहे.


राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं नेहमीच एकमेकांविरोधात या मतदारसंघात लढाई केली आहे. त्यामुळेच अगोदरच गुडघ्याला बाशिंग बांधून आमदारकीची निवडणुक लढवण्याच्या तयारीत असलेले सुधाकर घारे यांनी केलेली थोरवे यांच्या विरोधातील भाषणे किंवा शक्तिप्रदर्शन हे नेहमीच चर्चेचा विषय बनला. यावरून आता या दोघांमध्ये कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर भाजपमध्ये गेलेले माजी आमदार सुरेश लाड यांनी सुद्धा या मतदारसंघाचा दांडगा अनुभव असल्याने कदाचित ते सुद्धा निवडणुकीसाठी इच्छुक असू शकतात.  त्यांच्यासाठी भाजप कोणता विचार करेल हे महत्वाचे ठरणार आहे.


अलिबाग मुरुड मतदारसंघ


अलिबाग मतदारसंघात सुद्धा एकंदरीत अशीच परिस्थिती आहे. विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांनी शेकापच्या सुभाष उर्फ पंडित पाटील यांना 32 हजार 924 मतांनी पराभूत केलं आणि हा गड शिवसेनेच्या ताब्यात आणून दिला. मात्र सत्तांतर झाल्यानंतर आता महेंद्र दळवी हे महायुतीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. मात्र त्यांना या मतदारसंघात भाजप आव्हान देत असल्याचं पहायला मिळत आहे. 


शेकापमधून भाजपमध्ये गेलेले माजी सभापती दिलीप भोईर यांनी चक्क आमदारकी लढवण्याची तयारी दाखवली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केनी यांनी तर भोईर यांना माकड चाळे बंद करा असं म्हणत टीका केली आणि नव्या वादाला तोंड फोडलं.


यामुळे पेटून उठलेले भाजपचे दिलीप भोईर यांनी राजा केनी यांची भरसभेत कुंडलीच काढली. राजा केनी हे मी जिल्हा परिषदेवर सभापती असताना चोऱ्या करायचे अशी टिका त्यांनी केली. त्यामुळे येत्या काळात राजा केनी विरुद्ध दिलीप भोईर असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. या वादात आमदार महेंद्र दळवी यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी अलिबाग येथे पार पडलेल्या शिंदे गटाच्या आढावा बैठकीत शेकापच्या जयंत पाटील यांना काळ्या नागाची उपमा देत त्यांच्यावर टीका केली होती. यामुळे अगोदरच शेकाप विरूद्ध शिवसेना महेंद्र दळवी असा वाद असताना त्यात म्हात्रे यांचे जयंत पाटील यांच्यावरील टिकास्त्र पुनः नव्या वादाला तोंड फोडणारं ठरलंय. याचा फायदा कदाचित दिलीप भोईर यांना होऊ शकतो. 


दिलीप भोईर हे शेकापमधून नुकतेच भाजपमध्ये गेलेले नेते आहेत. त्यामुळे शेकाप एकवेळ भोईर यांना बाहेरून मदत करू शकते. महेंद्र दळवी यांना पाडण्यासाठी पुन्हा शेकाप कंबर कसून बसल्याचं बोललं जातंय. विधानपरिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील पराभूत झाल्यानंतर स्वतः आमदार महेंद्र दळवी चिखलात लोळले होते. त्यामुळे अलिबाग मुरुड मतदारसंघात वेगळेच वारे वाहू लागलं आहे. त्यामुळे ऐनवेळेला या मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार असेल हे आता तरी सांगणे कठीण आहे.


ही बातमी वाचा: