Karjat Khalapur Assembly Election : कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवारीसाठी आग्रही आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीकडून बाशिंग बांधून ऊभे असलेले इच्छुक उमेदवार सुधाकर घारे या दोघांमध्ये कलगीतुरा रंगलेला बघायला मिळतोय. त्यामुळे कुणाला तरी एकाला तिकीट मिळाल्यास दुसरा उमेदवार महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत युतीचा फॉर्म्युला उपयोगात आणला तर अजितदादांच्या सुधाकर घारे यांना त्यांच्या इच्छेला मुरड घालण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. पक्षाच्या नेत्यांनी तसे सुतोवाच देखील केलेले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुधाकर घारे तुतारी वाजवणार किंवा मशाल पेटवणार अशी चर्चा रंगली आहे. 


महेंद्र थोरवे-सुधाकर घारे राजकीय वाद


सुधाकर घारे हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षात काम करत आहेत. मात्र त्यांच्यात आणि स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्यात बिनसल्याने मोठा कलगीतुरा रंगलेला पहायला मिळतो आहे. सुधाकर घारे हे गुडघ्याला बाशिंग बांधून आमदारकी लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र असं असलं तरी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाला 3, भाजप 3 आणि राष्ट्रवादीच्या वाटेला 1 मतदारसंघ येणार असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये कर्जत खालापूर मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे हे पुन्हा निवडणुक लढवणार हे मात्र निश्चित आहे.


कर्जत खालापूरमधे शिवसेना शिंदे गटाचा आमदार असला तरी या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद अधिक असल्याचा दावा केला जातोय. त्याच आधारावर सुधाकर घारे हे उमेदवारीवर ठाम आहेत. त्यामुळे सुधाकर घारेंना उमेदवारी मिळाली नाही तर ते महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.  


अशातच आता राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. आपली नाराजी आणि भूमिका उघडपणे मांडताना दिसत आहेत. त्यामुळे सुधाकर घारे यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर येत्या काही दिवसात ते उद्धव ठाकरे यांच्या सेनेत किंवा शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


ही बातमी वाचा: