Raigad Crime : रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरमध्ये (Khalapur) अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणाचा सुमारे आठवडाभराने उलगडा झाला आहे. संबंधित अल्पवयीन मुलीचा मृत्यू हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्यात नाही तर अतिप्रसंगानंतर डोक्यात दगड घालून झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आठवडाभरापूर्वी खालापूर इथल्या जंगल भागात आढळून आलेल्या अल्पवयीन चिमुरडीच्या हत्येप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अजय चव्हाण असं या आरोपीचं नाव असून तो कारगाव तालुक्यातील रहिवासी आहे. 


18 डिसेंबर रोजी मृतदेह आढळला


खालापूर तालुक्यातील कारगावनजीकच्या जंगलात 18 डिसेंबर रोजी आठ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता. यावेळी, या चिमुरडीचा मृत्यू हा हिंस्त्र प्राण्याने केल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु वन विभागाच्या मदतीने या परिसरात हिंस्त्र श्वापदांच्या वास्तव्याच्या खुणा शोधल्या असता तसे कुठलेही पुरावे वनविभाग आणि पोलिसांना आढळून आले नाहीत. त्यातच या मुलीचा मृतदेह मुंबईतील जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. पोस्टमॉर्टेम अहवालात या मुलीची हत्या झाल्याचं उघड झालं. गळा दाबून आणि डोक्यात दगड मारुन तिचा खून झाल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.


पोलिसांचे पथके तयार करुन आरोपीचा शोध


या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पोलिसांना या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले. स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागासह खालापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी या गुन्ह्याचा तपास करत होते. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांची पथके तयार करुन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु हत्या जंगल परिसरात झाल्याने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे किंवा इतर तांत्रिक पुरावं उपलब्ध होऊ शकत नव्हते. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. पोलिसांनी अनेकांकडे चौकशी केली. 


जंगली श्वापदांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं भासवण्यासाठी डोक्यात दगड घालून खून


मुलीला जंगलाच्या दिशेने जाताना पाहिलं, असं कारगावमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने सांगितलं होतं. परंतु चौकशीदरम्यान तो तरुण घाबरेलला दिसला. परिणामी तो प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती पोलिसांना देऊ लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असताना त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संबंधित मुलगी एकटीच जंगल परिसरात जात असल्याचं पाहिल्यानंतर तिचा पाठलाग केला. त्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही बाब ती आपल्या कुटुंबियांना सांगेल या भीतीने आरोपीने तिचा गळा दाबून हत्या केली. मृतदेहाची ओळख पटू नये आणि जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याचं भासवण्यासाठी त्याने दगड डोक्यात घालून तिचा खून केला.


दरम्यान पोलिसांनी आरोपी अजय चव्हाणला अटक करुन न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (30 डिसेंबर) पोलीस कोठडी सुनावली