Mmbai To Alibag High Speed Cruise : आगामी नवीन वर्षाच्या सुरूवातीला रायगड जिल्ह्याच्या पर्यटनात भर पडणार आहे. येथे आशियातील पहिली भारतीय हायस्पीड क्राफ्ट रो -पेक्स क्रूझ सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये, मुंबईहून काशीद - दिघी अशी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. कोकण गौरव क्रूझ सेवेची घोषणा मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर , गौरव क्रूझ प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य प्रवर्तक आणि संचालक गौतम प्रधान, महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर आणि महिंद्रा हॉलिडे अँड रिसॉर्टस लिमिटेडचे चेअरमन अरुण नंदा आदी मान्यवर उपस्थित होते.
'कोकण' हे पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असून मुंबईलगत असलेल्या रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे हे राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. यामध्ये, रायगड जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील काशीद आणि अलिबाग येथील समुद्रकिनाऱ्यांना विशेष पसंती आहे. तर, श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर आणि दिवेआगार येथील समुद्रकिनारा हा देखील पर्यटकांचे आकर्षण आहे. कोकण गौरव ही कोकण प्रदेशातील प्रवासाची पुनर्परीभाषित करणारी पहिली 'रो-पेक्स' क्रूझ आहे. या क्रूझची फेरी मुंबई ते काशीद आणि दिघी असणार आहे. आयआरएस ध्वजाखाली बांधलेले हे अत्याधुनिक विलासी हायस्पीड क्राफ्टचा प्रवासाचा वेळ ६ तासावरून निम्मा होणार असून ४९ नॉटिकल मैल असा प्रवास करणार आहे. तर, मुंबई ते काशीद - दिघी दरम्यान सुरू होणारी रो - पेक्स सेवेमुळे महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील प्रवासाचा मार्ग बदलेल आणि कोकण प्रदेशातील प्रवासात बदल घडवून आणेल. तर काशीद आणि दिघीपासून सुरुवात करण्यासाठी ही रोपेक्स महाराष्ट्राच्या पश्चिम भागात सेवा देणार आहे.
दरम्यान, मुंबई ते रायगडच्या पश्चिम किनारपट्टी दरम्यान सुरू होणाऱ्या या क्रूझच्या एका फेरीतून 260 प्रवासी, 20 कार आणि 11 मोटारसायकल नेण्यात येणार आहेत. यावेळी, कोकणात अंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन घडविण्याची महत्वकांक्षा असून ही 'रो -पेक्स' इतरांसाठी आदर्श ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.