Raigad Rains : रायगड (Raigad) जिल्ह्यातील माथेरान (Matheran) इथे गुरुवारी (14 जुलै) दिवसभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून आजपर्यंत झालेल्या पावसाच्या हंगामातील सर्वाधिक 354 मिमी नोंद करण्यात आली आहे. तर, गेल्या दीड महिन्यात झालेल्या पावसामुळे माथेरान इथे सुमारे 84.72 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.


यंदाच्या हंगामात उशिरा सुरु झालेल्या पावसाने गेल्या दहा दिवसांपासून चांगली हजेरी लावली आहे. त्यातच, गेले दोन ते तीन दिवस रायगड जिल्ह्यात 'रेड अलर्ट' देण्यात आला होता. पाली, रोहा, कर्जत, खालापूर, माणगाव, पनवेल, पेण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये, जिल्ह्यातील नदीपात्रातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास नद्या या इशारा पातळीच्या वरुन दुथडी भरुन वाहत होत्या. यामुळे पाली, खालापूर, नेरळ येथील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.


दरम्यान, गेल्या काही दिवसात माथेरान येथे जोरदार पावसाने हजेरी लावली असून मंगळवारी (12 जुलै) दिवसभरात 217 मिमी, बुधवारी (13 जुलै) 243 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, गुरुवारी (14 जुलै) दिवसभरात माथेरान येथे 354 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या दीड महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद असल्याचे सांगण्यात आले आहे.


त्यातच, पावसाळ्याच्या हंगामात माथेरान येथे सरासरी 3038 मिमी पावसाची नोंद होत असून गेल्या दीड महिन्यात त्यापैकी 257.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, माथेरान येथे आजमितीस हंगामातील एकूण पर्जन्यमानाच्या सरासरी सुमारे 84.72 टक्के पावसाची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यातील इतर भागात सरासरी 50 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.


रायगडमध्ये एनडीआरएफची दोन पथकं तैनात
आज पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. रायगड जिल्ह्यात आजपासून पुढील काही दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे NDRF आणि SDRF च्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच तैनात केल्या आहेत. रायगड- महाड  इथे एनडीआरएफची दोन पथकं तैनात करण्यात आली आहे.