रायगड : मुंबईहून गावाकडे जाऊन चाकरमान्यांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. आता, हेच कोकणातील गावी गेलेले चाकरमानी आता मुंबईत परत येत आहेत. मात्र, मुंबईवरून (Mumbai) आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जात असलेल्या चाकरमान्यांना माणगावमधील मुंबई-गोवा हायवेवर असलेल्या जोशी वडेवाले हॉटेलमध्ये (Hotel) मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. नाश्ता करण्यासाठी मागवलेल्या वड्यांमध्ये मीठ जास्त असल्याची तक्रार या व्यक्तींनी सबंधित हॉटेल चालकाला विचारली. मात्र, तक्रार समजून घेण्याच्या अगोदरच तक्रारदाराला दम देऊन शिव्या देण्यास सुरूवात केली. या हॉटेलमध्ये काम करत असलेल्या उत्तर भारतीयांनी 2 छोट्या मुलांसह महिलांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेनं (MNS) हॉटेलविरुद्ध दंड थोपटल्याचं पाहायला मिळालं.
हॉटेलमधील कामगारांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मारहाण होत असेलली एक महिला गर्भवती असल्याचे देखील समोर आले. या महिलांवर चक्क खुर्ची उचलून मारहाण करुन त्यांचे मंगळसूत्र सुध्दा खेचण्याचा प्रयत्न या घटनेत झाल्याचे समोर आले आहे. तसेच, 2 मुलांना नखाने ओरबाडे काढून त्यांना देखील हॉटेलचालकासह कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. या घटनेसंदर्भात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाश्ता करायला गेलेल्या मुंबईकर चाकरमान्यांना नामांकित हॉटेलमध्ये मारहाण झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यानंतर, आता मनसेनं याप्रकरणी पोलिसांत धाव घेतल्यानंतर हॉटेल बंद करण्यात आल्याची माहिती आहे. मसनेच्यावतीने संबंधित वडेवाल्या हॉटेलचालकाविरुद्ध आवाज उठवण्यात आल्यानंतर अखेर जोशी वडेवाल्याकडून काल हॉटेल बंद करण्यात आले होते.
माणगांव मधील जोशी वडेवाले हॉटेलमधील मालकाने व कर्मचाऱ्यांनी मराठी माणसावर झालेल्या मारहाणी प्रकरणी परप्रांतीय हॉटेलचालक शुभम जैस्वाल यांचावर कारवाई होऊन हॉटेल बंद करावे या करिता श्रीवर्धन तालुका मनसेनेचे अध्यक्ष चिमण सुकधरे यांच्यासह मनसैनिकांनी माणगांव पोलीस निरीक्षक बोराडे यांना निवेदन दिले. या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन जोशी वडेवाले हॉटेल बंद करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच, संबंधित हॉटेलचालक व कर्मचाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही मनसेनं केली आहे. दरम्यान, मनसेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी यापुढे कोकणातीत मराठी माणसाला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरीत कोणत्याही उपहारगृहात मारहाण झाली, अथवा दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशाराही दिला आहे.
हेही वाचा
धक्कादायक ! जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा स्मशानतच ठिय्या