भंडारा : जिल्हा रुग्णालयात किंवा शासकीय रुग्णालयात (Hospital) सुविधा चांगल्या मिळत नसल्याची ओरड सातत्याने होत असते. अनेकदा रुग्णांना येथील रुग्णालयात वाईट अनुभव येतात, कधी वेळेवर डॉक्टर हजर नसतात. तर, रुग्णालयातील स्टाफकडून चांगली वागणूक मिळत नाही, कधी रुग्णालयातील स्वच्छता आणि सोयी सुविधांवरूनही प्रश्न उपस्थित केले जातात. आता, भंडारा (Bhandara) जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे प्रसुतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलेल्या महिलेचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक बाब काल मध्यरात्री भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. त्यावरुन, आता नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत गंभीर आरोप केले आहे. तसेच, स्मशानभूमीतच ठिय्या आंदोलनही सुरू केले आहे.

  


भंडाराच्या लाखनी तालुक्यातील लोहारा खराशी गावातील अश्विनी मेश्राम असं मृतक महिलेचं नावं आहे. अश्विनीला तिच्या कुटुंबियांनी काल जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केलं होतं. प्रसूती दरम्यान तिचा मृत्यू झाला, दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयातून महिलेचं शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर, आज सकाळी महिलेवर अंत्यसंस्कार करण्याकरिता कुटुंबीय मृतदेहासह गावाच्या स्मशानभूमीत पोहोचले होते. यावेळी महिलेला मुलगा झाल्याचं मात्र तो मृत असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यामुळे त्याला दफन करण्याच्या विधीसाठी शवविच्छेदन केलेल्या महिलेचा मृतदेह नातेवाईकांनी उघडला. मात्र, त्यात कुटुंबियांना बाळ दिसलेच नाही. त्यावरून जिल्हा सामान्य रुग्णालयातून चुकीची माहिती दिल्याचा संताप कुटुंबीयांनी व्यक्त करत स्मशानभूमितचं संताप व्यक्त केला. तसेच, मृत महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता याची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी या मागणीला घेऊन कुटुंबीयांनी स्मशानभूमीतचं ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. 


जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रतिक्रिया


दरम्यान, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महिलेला वेळेत प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केलं नाही आणि त्यात तिला BP चा त्रास असल्यानं मृत्यू झाल्याची माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती लोहारा खारशी येथे पाठविल्याची माहितीदेखील जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे. 


हेही वाचा


...म्हणून केजरीवालांनी राजीनाम्यासाठी 2 दिवसांचा वेळ घेतला; भाजपने सांगतिलं राज'कारण'