रायगड : महायुतीत जागावाटपापूर्वीच तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून येते. सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते 288 ही जागा मागतील, अशा शब्दात महायुतीमधील जागावाटपाच्या चर्चांवर शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena) आमदार महेंद्र थोरवे यांनी पलटवार केला आहे. महायुतीमध्ये राज्यातील काही मतदारसंघावरुन घमासान होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, अनेक मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दावा केला जात आहे. तर, काही ठिकाणी भाजप पदाधिकारी व इच्छुकांकडूनही दावा केला जात आहे. त्यामुळे, महायुतीत जागावाटपावरुन संघर्ष अटळ असल्याच दिसून येते.  त्यातच, आता कर्जत खालापूर मतदार संघावरुन महायुतीमध्ये (Mahayuti) रणसंग्राम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर आता आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे, महायुतीमध्ये जागावाटपावरुन होत असलेली लढाई अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण, राज्यातील अनेक जागांवर तिन्ही पक्षातील स्थानिक नेते दावा करताना दिसून येतात. 


महायुतीमध्ये जागावाटपाबाबत आम्ही खूप मोठ्या जागेच्या निष्कर्षापर्यंत पोहचलो आहोत, लवकरच उरलेल्या जागेबाबत निर्णय घेतला जाईल, असे सुनील तटकरे यांनी म्हटले. तसेच, कर्जत-खालापूर मतदारसंघावरही त्यांनी दावा केला होता. त्यामुळे, मुंबईजवळील कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील मित्र पक्षातील सुनील तटकरे व आमदार महेंद्र थोरवे आमने सामने आले आहेत. सुनील तटकरे यांनी रोहा येथे कोलाड सुतारवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना कर्जत खालापूर मतदार संघातील जागेवर राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले. त्यावरुन, आता महायुतीत येथील जागेवरुन बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. खोपोली नगर पालिकेच्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांना टोला लगावला. सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना त्यांच्या पक्षासाठी जागा मागण्याचा अधिकार आहे. ते सर्व 288 जागा देखील मागतील.परंतु जागा वाटपाचा निर्णय महायुतीतील वरिष्ठ पातळीवरील नेते घेतील, तेव्हा नक्कीच निर्णय कळेल, असा टोला महेंद्र थोरवे यांनी सुनील तटरेंना लागवला. 


भाजप स्थानिक नेत्यांकडून होतोय दावा


दरम्यान, महायुतीमध्ये राज्यातील अनेक मतदारसंघात तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते जागांवर दावा करत आहेत. त्यामुळे, जागावाटपाच्या घोषणेनंतर मतदारसंघात मोठ्या बंडाची शक्यता दिसून येते. काही दिवसांपूर्वी पुण्यात पंकजा मुंडे यांच्यासमोरही भाजप पदाधिकाऱ्यांनी तेथील जागेवर भाजपचा दावा केला होता. तसेच, महायुतीत ही जागा भाजपला न सुटल्यास आपण राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी भूमिकाच भाजप पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली होती. 


हेही वाचा


कोकणातून मुंबईकडे निघालेली 60 प्रवाशांची बस भातशेतीत कोसळली; स्थानिक धावले