रायगड:  तरुणांमध्ये बॉडीबिल्डिंगचं मोठं फॅड आहे. जिममध्ये जाऊन पिळदार शरीरयष्टी बनवण्याकडे बहुतेकांचा कल असतो. मात्र बॉडीबिल्डिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवलेला तरुणानं थेट शेतीचा मार्ग धरला आहे.

रायगडच्या सुमित थळे या तरुण शेतकऱ्यानं पॉलीहाऊसमध्ये शिमला मिरचीची लागवड केली. शेतीचं अभ्यासपूर्ण नियोजन करुन, या तरुणानं इथेही सोनं कमावलं आहे.

27 वर्षीय सुमितने 20 गुंठे जागेत लाल आणि हिरव्या शिमला मिरचीची लागवड केली. काटेकोर नियोजनातून त्याला वर्षाला 30 टन मिरचीतून 45 लाख रुपयांचं उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

बॉडीबिल्डिंग ते कसदार शेती

उरण तालुक्यातील मुळेखंड येथे राहणारा सुमित थळे हा पदवीधर आहे. गेल्या चार वर्षांपासून तो बॉडीबिल्डिंग करीत आहे. त्याने मुंबई आणि ठाणे येथील बॉडीबिल्डिंग स्पर्धेत पदकं मिळविली आहेत.

सुमितने 2017 मध्ये ठाणे नवदीप बॉडीबिल्डिंग स्पर्धेच्या 75 किलो गटात, तर 2016 मध्ये मुंबई नवदीप बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे.

एकीकडे बॉडीबिल्डिंग करत असताना, सुमितने शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले.

20 गुंठ्यात पॉलीहाऊस

सुमितने 20 गुंठे जागेत पॉलीहाऊस उभारले. त्यामध्ये त्याने लाल आणि हिरव्या शिमला मिरचीची लागवड केली. यासाठी त्याने मामाची भातशेतीची जमीन भाडेतत्वावर घेत, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि बँकेकडून कर्ज घेतले.

पॉलीहाऊसच्या उभारणीसाठी सुमितला सुमारे 20 लाख रुपयांचा खर्च आला.  20 गुंठे जागेमध्ये त्याने सुमारे 6 हजार रोपांची लागवड केली.

पॉलीहाऊसमध्ये लावण्यात आलेल्या शिमला मिरचीमधून पुढच्या 45 दिवसात उत्पादनाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.

यासाठी त्याने एक मिटर रुंदीचे वाफे तयार केले असून, झिगझॅग पद्धतीने रोपांची लागवड केली आहे. तर, शिमला मिरचीसाठी आवश्यक असलेले 30 अंश सेल्सिअस तापमान राखण्यासाठी, सुमितने या पॉलीहाऊसमध्ये 'फॉगर' लावले आहेत. तसंच ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे नियोजन केले आहे.

पॉलीहाऊसमध्ये लावण्यात आलेल्या शिमला मिरचीला दिवसातून दोन वेळा पाणी देण्यात येते.

सुमितने केलेल्या या धाडसामुळे शिमला मिरचीच्या या उत्पादनातून, येत्या वर्षभरात त्याला किमान 40 ते 45 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

यासाठी त्याला घाऊक बाजारात एक टनाला 150 रुपयांचा दर मिळणे अपेक्षित आहे.

पॉलीहाऊसच्या उभारणीसाठी सुमितला राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 8 लाख 97 हजार 120 रुपयांचे अनुदान मिळाले. त्याने बँक ऑफ महाराष्ट्रमधून 19 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.

मात्र सुमितने केलेले कष्ट, नवा प्रयोग करण्याचं धाडस आणि त्यातून आलेलं दमदार पीक, यामुळे सुमितला कर्ज फेडण्यास आता फारसं अवघड नाही. त्यामुळे, सुमितसारख्या तरुणांनी आधुनिक शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहण्याची गरज आहे.

VIDEO: