मुंबई : मुंबईतील मालाड पूर्व भागातले शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात कुरार पोलिसांना यश आलं आहे. एसआरए प्रकल्पाच्या वादातून सावंत यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. हत्येच्या कटातील मुख्य आरोपी, दोन शूटर आणि चौघे साथीदार अशा सात आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


सचिन सावंत हे शिवसेनेच्या मालाडमधील शाखा क्रमांक 39 चे माजी उपशाखाप्रमुख होते.

मालाडमधील एसआरए प्रकल्पाच्या वादातून सचिन सावंत यांची 10 लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवण्यात आली. मुंबईतील विविध भागात घरं देण्याचं आमिष शूटर्सना देण्यात आलं होतं.

मुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या

लोकेश देवेंद्र सिंग, अभय ऊर्फ बारक्या किसन साळुंखे, सत्येंद्र ऊर्फ सोनू रामजी पाल, निलेश रमाशंकर शर्मा, ब्रिजेश ऊर्फ ब्रिजा नथुराम पटेल, ब्रिजेश श्रीप्रकाश सिंह आणि अमीत निरंजन सिंह अशी या सात आरोपींची नावं आहेत. ब्रिजेश पटेल मुख्य आरोपी असून लोकेश आणि अभय हे शूटर असल्याची माहिती आहे.

निलेश रामशंकर शर्मा हा सचिन सावंतांचा जवळचा मित्र होता, मात्र एसआरए प्रकल्पातील वादामुळे तो प्रतिस्पर्धी गटात सामील झाला. कुरार पोलिसांनी मालाड आणि उत्तर प्रदेशमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या सर्वांना बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

22 एप्रिल रोजी क्रांतीनगरात शाखेची मिटींग संपल्यानंतर सचिन सावंत सहकारी जगन्नाथ वर्मासोबत बाईकवरुन गोकुळनगरला जात होते. त्यावेळी सचिन सावंत यांना काही जणांनी हाक मारली आणि तीन राऊंड गोळ्या झाडल्या. सचिन सावंत यांना महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.