नवी दिल्ली: मोदी सरकार आज रब्बी पीकांसाठी हमीभाव जाहीर करण्याची शक्यता आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची चिन्हं आहेत. प्रत्येक पीकाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव निश्चितच मिळेल असा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे. त्यामुळे सर्व पीकांना 50 टक्के फायदा होईल, असं सरकारचं म्हणणं आहे.
गव्हाचा हमीभाव 105 रुपये प्रति क्विंटलने वाढणार
एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, रब्बी हंगामातील सर्व 6 पीकांचा हमीभाव निश्चित करण्यात येणार आहे. या पीकांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गव्हाचा हमीभाव 105 रुपये प्रति क्विंटलने वाढवण्यात येणार आहे. सध्याचा दर 1735 रुपये प्रति क्विंटलवरुन 1840 रुपये होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे चना म्हणजेच हरभऱ्याचा हमीभाव 220 रुपयांनी वाढवून तो 4620 रुपये प्रति क्विंटल करण्याचा प्रस्ताव आहे. तर मसूरचा हमीभाव 225 रुपये प्रति क्विंटल वाढवून 4475 रुपये होण्याचा अंदाज आहे.
मोहरीला 200 रुपये वाढवून 4200 रुपये दर मिळण्याची अपेक्षा आहे. तर बाजरीला 30 रुपये प्रति क्विंटल वाढून 1440 रुपयाचा भाव मिळेल.
सर्वात जास्त हमीभाव सूर्यफुलाला मिळणार आहे. सध्या सूर्यफुलाला 4100 रुपये भाव असून तो 4945 रुपयांपर्यंत पोहोचण्याची चिन्हं आहेत. म्हणजेच सध्याच्या दरात 845 रुपये वाढ होण्याची आशा आहे.
पुढील वर्षी खरेदी
नवा हमीभाव यंदा नोव्हेंबरमध्ये लागवड केल्या जाणाऱ्या रब्बी पिकांना लागू होणार आहे. त्यांची खरेदी पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात होते. सरकार दरवर्षी रब्बी लागवडीपूर्वी हमीभाव जाहीर करतं. मोदी सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, यंदा रब्बीला भरघोस हमीभाव देऊन, मतदारांना खुश करण्याची चिन्हं आहे.
उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव
मोदी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जुलैमध्ये धानासह सर्व खरीप पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली होती. आता सरकार रब्बी पिकांचा हमीभावही वाढवणार आहे.
शेतकऱ्यांची प्रमुख मागणी
दिल्ली-यूपी सीमेवर किसान क्रांती यात्रा काढलेल्या आंदोलकांनी दीडपट हमीभावाची मागणी केली आहे. मात्र सरकारने देऊ केलेल्या हमीभावाचं गणित त्यांना मान्य नाही. ज्या फॉर्मुल्याने सरकार दीटपड हमीभाव देत आहे, ते चुकीचं असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
आंदोलक शेतकरी स्वामीनाथन आयोगाच्या अहवालात सांगण्यात आलेल्या C2 फॉर्मुल्याच्या आधारे हमीभाव देण्याची मागणी करत आहेत. मात्र सरकार A2+FL फॉर्मुल्यानुसार हमीभाव देत आहे. C2 फॉर्मुल्यामध्ये शेतकऱ्यांना जमीनभाडेही देण्याची तरतूद आहे.
संबंधित बातम्या
किसान क्रांती यात्रा आंदोलन रात्री उशिरा मागे
हमीभाव न दिल्यास व्यापाऱ्यांना शिक्षेचा निर्णय बारगळला
केंद्र सरकारचा दीडपट हमीभाव ही निव्वळ धूळफेक, हायकोर्टात याचिका
स्पेशल रिपोर्ट : शेतमालाला वाढीव दर अच्छे दिन घेऊन येणार का?
712 नवी दिल्ली: कोणत्या पिकाला किती हमीभाव?
पिकांना दीडपट हमीभाव, मोदींची हमी, FRP लवकरच जाहीर करणार!