नवी दिल्ली: प्रचंड राडेबाजीनंतर दिल्लीकडे निघालेल्या किसान क्रांती यात्रेचं आंदोलन काल मंगळवारी रात्री उशिरा संपवण्यात आलं.  गाझीपूर सीमेवर डेरा टाकून बसलेल्या हजारो शेतकऱ्यांना, दिल्ली पोलिसांनी काही अटींवर चौधरी चरण सिंह यांच्या समाधीस्थळी जाण्यास परवानगी दिली. शांततेने कोणतीही हिंसा न करता शेतकऱ्यांनी समाधीस्थळावरुन परत जावं अशी अट पोलिसांनी घातली, ती शेतकऱ्यांनी मान्य केली. अखेर मंगळवारी रात्री सुमारे 12.30 वाजता पोलिसांनी बॅरिकेट्स बाजूला केले आणि शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यास परवानगी दिली. पोलिसांच्या परवानगीनंतर शेकडो ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसह हजारो शेतकरी राजघाटावरील चौधरी चरण सिंह समाधीस्थळी पोहोचले. किसान घाटावर पोहोचताच फुलं वाहून किसान युनियनने आंदोलन संपल्याचे जाहीर केले.


किसान क्रांती यात्रा 23 सप्टेंबरला हरिद्वार येथून किसान घाटाच्या दिशेनं निघाली होती. मात्र पोलिसांनी दिल्लीच्या सीमेवरच शेतकऱ्यांना अडवून आधी पाण्याचे फवारे, मग अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि त्यानंतर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. या सर्व प्रकारानंतर शेतकऱ्यांना आक्रमक पवित्रा घेतला. मात्र आपलं आंदोलन किसान घाटपर्यंतच असल्याने, आंदोलक किसान घाटावर पोहोचल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.  स्पेशल रिपोर्ट: गांधी जयंतीला दिल्लीत 'हिंसेचे प्रयोग'  

यावेळी हे सरकार शेतकरी विरोधी असून त्यांनी आमची कोणतीच मागणी मान्य केलेली नाही. तरीही, आम्ही हे आंदोलन मागे घेत असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलं.

दरम्यान,  काल सकाळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये हिंसक संघर्ष दिसून आला. शेतकऱ्यांना दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर रोखण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती.

दिल्ली, पंजाब, उत्तराखंडमधल्या हजारो शेतकऱ्यांची ही किसान यात्रा 23 सप्टेंबरला हरिद्वारपासून सुरु झाली होती. ही यात्रा दिल्लीत पोहोचणार म्हटल्यावर पोलिसांनी दिल्लीच्या सगळ्या सीमा बंद केल्या. जणू आंदोलनकर्त्यांना दिल्लीत पाऊल ठेवू द्यायचं नाही हा सरकारचा इरादा. दिल्लीच्या सीमेवर जवान आणि किसान आमने-सामने 

गेल्या दहा दिवसांपासून ही किसान यात्रा सुरु होती. ती दिल्लीत धडकेपर्यंत सरकार गाफील राहिलं. पण हे वादळ दिल्लीच्या वेशीवर आल्यानंतर मात्र हालचाल सुरु झाली. दहा दिवसानंतर आंदोलनाच्या प्रतिनिधींना पहिल्यांदा चर्चेचं बोलावणं आलं. कृषीमंत्री राधामोहन सिंह तर कालही दिल्लीतून गायबच होते, मग गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर हा तोडगा सोडवण्याची जबाबदारी आली.

30 वर्षांपूर्वी म्हणजे 1989 मध्ये टिकैत यांनी हजारो शेतक-यांसमवेत संसदेवर धडक देऊन दिल्ली हादरवून सोडली होती. शेतकरी आपल्या जनावरांसह दिल्लीत दाखल झाले होते.  आज 30 वर्षानंतर त्यांचा मोठा मुलगा आणि भारतीय किसान युनियनचा अध्यक्ष नरेंद्रसिंह टिकैत या आंदोलनाचं नेतृत्व करत होते.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार कृषिमालाला भाव मिळावा

  • शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा

  • किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज मिळावं

  • देशभरातील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा

  • 14 दिवसात ऊसाचा हमीभाव निश्चित करा

  • एनसीआर क्षेत्रात दहा वर्ष जुन्या ट्रॅक्टरवरील बंदी मागे घ्यावी

  • व्यावसायिक वापरासाठीच्या साखरेला किमान 40 रुपये किलो भाव द्या


संबंधित बातम्या 

स्पेशल रिपोर्ट: गांधी जयंतीला दिल्लीत 'हिंसेचे प्रयोग'  

दिल्लीच्या सीमेवर जवान आणि किसान आमने-सामने