मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या गेम शो 'कौन बनेगा करोडपती?-10'ला सीजनचा पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. बिनिता जैन असं या महिला स्पर्धकाचं नाव आहे. बिनिता यांनी केबीसी-10मध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत.


एक कोटी रुपये जिंकल्यानंतर बिनिता यांना सात कोटींचा प्रश्नही विचारण्यात आला होता. मात्र शेवटच्या प्रश्नाचं उत्तर बिनिता यांना माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांनी खेळात तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आणि एक कोटी रुपयांमध्ये समाधान मानलं.


काय होता सात कोटींचा प्रश्न?


1867 मध्ये पहिल्यांदा स्टॉक टिकरचा शोध कुणी लावला होता? असा प्रश्न बिनिता यांना सात कोटींसाठी विचारण्यात आला होता. मात्र बिनिता यांना स्टॉक टिकर म्हणजे काय हे देखील माहीत नव्हत. त्यामुळे त्यांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र खेळ सोडला तरी स्पर्धकाला उत्तर देण्याची संधी केबीसीमध्ये मिळते. ती संधी बिनिता यांनाही मिळाली आणि त्यांनी या प्रश्नाचंही बरोबर उत्तर दिलं. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यासह सर्वांनाच दु:ख झालं.


दहशतवाद्यांनी पतीचं केलं होतं अपहरण


बिनिता यांनी शोदरम्यान त्यांच्या आयुष्यातील काही दु:खद अनुभवही सांगितले. बिनिता यांचे पती 2003मध्ये बिझनेस ट्रिपसाठी गेले होते, मात्र तेथून ते परतलेच नाहीत. दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केल्याची माहिती नंतर उघड झाली. बिनिता यांच्या कुटुंबियांनी त्यांना शोधण्यासाठी आणि परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत.


या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी बिनिता यांच्यावर आली. त्यावेळी बिनिता यांनी शिकवणी घेण्यास सुरुवात केली. सात विद्यार्थ्यांपासून त्यांनी शिकवणी घेण्यास सुरुवात केली होती. आज त्यांच्याकडे 125 विद्यार्थी आहेत. बिनिता यांच्या आयुष्यातील खडतर प्रवास ऐकल्यानंतर अमिताभ बच्चनही भावूक झाले होते.