बारामती : गुंजवणी योजनेच्या पाईपलाईचे काम आमदार संजय जगताप यांनी अधिकाऱ्यांना धमकावून बंद पाडल्याचा आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात केलाय. गुंजवणी बंद जलवाहिनीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करावे त्यासाठी वेळ मिळावी म्हणून विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.


विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटलं की.. 


राज्यमंत्री पदाच्या काळात मोठ्या मेहनतीने मी पुरंदर, भोर आणि वेल्हा या तीन तालुक्यांना वरदान ठरणारे गुंजवणी धरण पूर्ण केले. प्रकल्पाच्या पाईपलाईनच्या कामालाही मागील वर्षी सुरुवात झाली. भोर आणि वेल्हा तालुक्यात काम सुरू आहे. योजना लवकर पूर्ण करण्याच्या हेतूने जलसंपदा विभागाशी समन्वय साधत काही दिवसांपूर्वी मी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनीच्या कामाला सुरुवात केली. मात्र या कामात सातत्याने अडथळे आणण्याचे काम स्थानिक आमदार संजय जगताप करत आहेत. आमदार संजय जगताप यांनी अधिकाऱ्यांना धमकावून गुंजवनीचे काम बंद सूचना दिल्या आहेत. तसेच कामाचे भूमिपूजन स्वतःच्या हस्ते करावं असाही आग्रह असल्याचे समजते. वास्तविक जलवाहिनी बंदद्वारे 100 टक्के सूक्ष्म सिंचन करणार देशातील पहिला प्रकल्प असून तो संबंध देशाला दिशा देणारा आहे. त्यासाठी मी तब्बल 1313 कोटी रुपयांना मी मंजुरी मिळवली होती. हरित लवाद, जलसंपत्ती अधिनियम प्राधिकरण, उच्च न्यायालय, केंद्रीय पर्यावरण विभाग अशा अनेक ठिकाणी सातत्याने याचिका करून काम होऊ नये म्हणून मला त्रास देण्यात आला आस या पत्रात शिवतारेनी म्हटलं आहे. तसेच तात्कालिक राज्य आणि केंद्र सरकारने बंद जलवाहिनीचा हा प्रकल्प पाहून इतके प्रभावित झाले की त्यांनी संबंध देशात यापुढे कालव्याने पाणी देण्याची पद्धत बंद करून जलवाहिनीचे धोरण स्वीकारले. ज्यांनी प्रकल्प होऊ नये यासाठी प्रयत्न केले त्यांच्या हस्ते अशा महत्वकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ व्हावा याच्या इतकी शोकांतिका असूच शकत नाही. सदर कामाचा शुभारंभ आपल्या व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व्हावा, अशी माझी इच्छा असल्याचे शिवतारेनी मुख्यमंत्र्यांला लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे.


या प्रकरणी अधिकाऱ्यांशी बोलणी केली असता त्यांनी आमदार संजय जगताप यांना या योजने संदर्भात काही शंका आहेत. त्यामुळे हे काम बंद करण्याच्या सूचना आमदार संजय जगताप यांनी दिल्या आहेत. त्या संदर्भात आमदार संजय जगताप हे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक लावणार आहेत. त्या बैठकीत शंकांचे निरसन झाल्यानंतर पुन्हा काम सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


1993 ला गुंजवणी धरण मंजूर झालं. परंतु 2014 साली राज्यमंत्री झाल्यावर विजय शिवतारे यांनी या धरणाचे काम पूर्ण केलं. त्यानंतर गुंजवणी धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी भोर, वेल्हे आणि पुरंदर तालुक्यातील गावांना न्यायचे अशी ही योजना आखली. यासाठी 1313 कोटी निधी देखील मंजूर करण्यात आला. भोर आणि वेल्हे तालुक्यात योजनेचे काम सुरू झालं होतं.  गेल्या काही दिवसांपासून पुरंदर तालुक्यात देखील या योजनेच्या पाईपलाईनचे काम सुरू झालं. कालपासून ते काम बंद करण्यात आलं आहे.