मुंबई : मुंबई-पुणे-मुंबई धावणारी डेक्कन एक्सप्रेस आजपासून पुन्हा एकदा धावू लागली आहे. प्रवासी नसल्याने ही एक्सप्रेस काही दिवस बंद ठेवण्यात आली होती. मात्र पुन्हा सुरू झालेली एक्सप्रेस आता नव्या एल एच बी डब्यांसह आणि नवीन विस्टाडोम कोच सोबत धावणार आहे. त्यामुळे खंडाळा आणि लोणावळा घाटाचे अद्भुत सौंदर्य आता विस्टाडोम कोच मधून अनुभवता येणार आहे. 


मुंबई-पुणे या रेल्वे प्रवासाला आता तब्बल 100 वर्षे पूर्ण होत आली आहेत.  मात्र निसर्गाचे असीमित वरदान लाभलेल्या या रेल्वे मार्गाचे सौंदर्य रेल्वेच्या जुन्या छोट्या खिडक्यांमधून किंवा छोट्या दरवाजात उभे राहून बघावे लागत होते. त्यातून कितीसा निसर्ग दिसणार.? पण आता तसा अडथळा येणार नाही.  कारण मुंबई पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना आता विस्टाडोम कोच मधून निसर्गाचा आस्वाद घेत प्रवास करता येणार आहे. 




भारतीय रेल्वेने खास काही रेल्वे मर्गांसाठी विस्टाडोम कोच निर्मिती केली होती. महाराष्ट्रात त्यापैकी कोकण रेल्वे मार्ग आणि पश्चिम घाटातून जाणारा मुंबई पुणे रेल्वे मार्ग आहे, आणि या दोन्ही रेल्वे मार्गावर विस्टाडोम कोच सह रेल्वे सुरू करण्यात आल्यात. मुंबई पुणे रेल्वे मार्गात तर खंडाळा आणि लोणावळा असे दोन निसर्गाची मुक्तहस्ताने उधळण झालेले घाट येतात.  त्यात मान्सून काळात कडे कपारीतून फेसाळत कोसळणारे झरे, बोगद्यातून जाताना वर दिसणारे उंचच उंच डोंगर माथे, दरी खोऱ्यात दिसणारे वळणावळणाचे रस्ते सर्व काही अगदी स्पष्ट, मोठ्या काचेच्या खिडक्यांच्या मधून आणि 180 डिग्री फिरणाऱ्या खुर्च्यांवर बसून पाहायला मिळणार आहे. 




या नवीन डब्यातून प्रवास करायचा असेल तर मात्र थोडे जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. डेक्कन एक्सप्रेसच्या साधारण तिकिटापेक्षा साहजिकच या डब्यातील एका सीटचे तिकीट खूप जास्त आहेत. 760 रुपये भरून तुम्ही या डब्यातून निसर्गाचा आनंद घेत प्रवास करू शकता. तिकीट जास्त असले तरी पुढील काही दिवस या डब्याचे बुकिंग फुल्ल आहे. म्हणजेच प्रवाश्यांचा चांगला प्रतिसाद या गाडीला असल्याचे दिसून येत आहे.