पुणे : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि सर्वाधिक हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यानंतर त्यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा सुद्धा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा भावनिकतेला बळी पडू नका, असे आवाहन करत अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवर तोफ डागली. 


बारामतीला लीड मिळणार की नाही ते बारामतीकर सांगतील


कोणत्याही भावनिकतेला बळी पडू नका. खोट्या प्रचाराला बळी पडू नका, बारामतीला लीड मिळणार की नाही ते बारामतीकर सांगतील अशा शब्दात अजित पवार यांनी दंड थोपटले. अजित पवार यांनी जाहीर सभेला संबोधित करताना बारामती तालुक्यामध्ये केलेल्या जोडण्यांमुळे वाढलेल्या ताकदीचा उल्लेख केला. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील, दौंडमधून राहुल कुल तसेच विजय शिवतारे यांच्यासोबत केलेला जोडण्यांचा आणि मतदारसंघातील प्रमुख नेत्यांचा उल्लेख केला. 


 मित्र कसा असावा आणि विरोध कसा असावा याचे उदाहरण विजय शिवतारे असल्याचेही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले. अजित पवार यांनी सांगितले की ही निवडणूक गावकी आणि भावकीची नाही, तर देशाची निवडणूक आहे. त्यामुळे देश नेमका कोणाच्या हातात द्यायचा याचा विचार करावा लागणार आहे. आज फक्त सुनेत्रा पवार अर्ज भरणार आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील, मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे यांचा नंतर अर्ज भरला जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 


ते पुढे म्हणाले की, विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. ते पुढे म्हणाले की मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अजित पवार यांनी या भाषणा बारामतीची लढाई पवार विरुद्ध पवार अशीच होणार असली, तरी पवार विरुद्ध पवार नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगण्याच प्रयत्न केला. ते पुढे म्हणाले, की काही लोक निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत. बनवाबनवीचे काम होत असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले. 


घड्याळाला मत म्हणजेच मोदींना मत


तत्पूर्वी, सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं. सुनेत्रा पवार यांनी मनोगत व्यक्त करताना बारामतीच्या विकासाचे संपूर्ण क्रेडिट अजित पवाराना दिले. त्या म्हणाल्या, की बारामतीमध्ये विकास काम झालं आहे त्यामध्ये अजित पवारांचे कष्ट आहेत. घड्याळाला मत म्हणजेच मोदींना मत असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले. 


महाराष्ट्रात अनेकवेळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न


प्रफुल पटेल यांनी सांगितले की, नुसत्या विदर्भाचे नाही, तर महाराष्ट्राचे शान देवेंद्र फडणवीस आहेत. महाराष्ट्राला नवीन वळण देणारा आजचा दिवस आहे. प्रफुल पटेल या मंचावर कसा असेल अनेकांना वाटलं असेल. मात्र, हा  विषय 2 जुलै रोजी संपला आहे. मागील 33 ते 35 वर्षांपासून बारामतीचे जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यात अजितदादांचा मोठा वाटा आहे असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रात अनेकवेळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. बदलत्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झालं आहे. भारताबाहेर नरेंद्र मोदींची ख्याती असल्याचे पटेल म्हणाले. सत्तेसाठी कोणी गेले नाही. सत्ता येते आणि जाते. विषय सत्तेचा नाही, कधी कधी देशाचा विचार केला पाहिजे असेही पटेल यावेळी म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या