Sharad Pawar Interview : नेहमी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. विद्यार्थ्यांनी टाकलेल्या गुगलीला शरद पवार यांनी लीलयापणे टोलावले. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानमधील गदिमा सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  विद्या प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या युवा महोत्सवात उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी पवार यांना प्रश्न विचारण्यात आले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी काही महत्त्वपूर्ण घटनांचाही उल्लेख केला. यावेळी पवार यांनी शालेय जीवन ते राजकारणातील प्रवासाबाबत भाष्य केले. प्रत्येकाची इच्छा असते त्यात यश मिळाले नाही तर ना उमेद होता कामा नये. परिश्रम केलं तर आज ना उद्या यश मिळते असा मोलाचा सल्लाही यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. एखादी व्यक्ती वयाने लहान असेल. पण तो ज्ञानी असेल तर त्याला लहान समजू नका. त्याच्याशी गप्पा मारा, असा सल्ला त्यांनी दिला. बारामतीत आयटी पार्क सुरू करण्याचा विचार सुरू आहे असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.


शरद पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, शालेय जीवनात शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर सार्वजनिक जीवनात कसे काम करायचं याचा फायदा झाला. पहिल्यांदा मला मुंबईतून टोकियो येथे पाठवण्यात आले. ती शिष्यवृत्ती मला युनोस्कोने दिली. त्यावेळी मी एक दिवस जनापच्या प्रधानमंत्री यांच्यासोबत होतो. त्यांचे कामकाज जवळून पाहता आले. जपानचे लोक मर्यादित बोलतात. यासह अनेक देशातील लोकांना भेटण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा मला आजही होत असल्याचे त्यांनी सांगितले. 


जास्त आव्हाात्मक काय होते? लातूर भूकंप की बॉम्ब हल्ला?


मुंबईत बॉम्बस्फोट होण्यापूर्वी सहा दिवसाआधी मी पदभार स्वीकारला होता. त्याआधी केंद्रीय संरक्षणमंत्री होतो. धार्मिक दंगे करण्याचा उद्देश पाकिस्तानचा होता. मुंबईत 11 ठिकाणी स्फोट झाला ती ठिकाणी हिंदू बहुल होती. पाकिस्तानला धार्मिक दंगे घडवयाचे होते. हिंदू-मुस्लिम संघर्ष होऊन नये म्हणून मी दूरदर्शनला गेलो आणि सांगितले की 12 ठिकाणी स्फोट झाले. मुस्लिम भागात देखील स्फोट झाल्याचे सांगितले होते. दोन दिवसात स्थिती पूर्ववत केली. जातीय दंगे झाले नाहीत अशी आठवण पवार यांनी सांगितली.


लातूरचा भूकंप झाला त्याआधीच्या रात्री गणपती विसर्जन झाले. त्या दिवशी मध्यरात्री 3 वाजता झोपायला गेलो. त्यानंतर 15 मिनिटात माझ्या खिडक्या वाजल्या. भूकंप झाला असल्याचा अंदाज बांधला. तातडीने कोयनामध्ये फोन केला. ते म्हणाले इथे भूकंप झाला नाही. लातूरला भूकंप झाला तेव्हा सकाळी मी 6 वाजता लातूरला पोहोचलो. लातूरला 9 हजार लोक मृत पावले तर 1 लाख घरे पडली होती. त्यावेळी मी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला आणि मदत मागितली. तीन तासात मदत यायला सुरुवात झाली. 15 दिवस मी लातूरला राहिलो होतो, अशी आठवण ही त्यांनी सांगितली. भूकंपाच्या काळात केलेल्या कामासाठी मला जागतिक बँकेने या आपदेत केलेल्या कामाचे अनुभव सांगण्यासाठी मला अमेरिकेत बोलावलं होतं, अशी आठवण यांनी सांगितली. 


ग्रामीण भागातून शहरी भागात जाताना काही बदल करण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. सुरुवातीला थोड बदल स्वीकारावे लगातात पण ग्रामीण भागात देखील प्रचंड गुणवत्ता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


राजकारणात पवार कसे आले? 


शरद पवार यांनी मला सांगितले की, मला शाळेचा अभ्यासाचा कंटाळा यायचा. शाळा संपली की बाहेर वेळ घालवायचो. MES शाळेत शिकत असताना माझ्या आईला वाटत होतो की मी शिकत नाही. म्हणून माझ्या भावाकडे मला राहायला पाठवले. प्रवरानगरला रयतच्या शाळेत प्रवेश घेतला. पोर्तुगीज मुक्त गोवा अशी मागणी केली जात होती. काही लोक महाराष्ट्रातून तिकडे गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार केला. काहीजण मृत्युमुखी पडले. त्यानंतर महाराष्ट्र पेटून उठला. आम्ही ज्या शाळेत शिकत होतो ती शाळा आम्ही बंद केली. माझ्या राजकारणाची सुरुवात तिथून झाली आणि आज मी अजून राजकारणात आहे, अशी आठवण पवार यांनी सांगितली. 


कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महत्त्वाची गोष्ट?


कृषी मंत्रीपदाच्या कार्यकाळातील अनुभव शरद पवार यांनी सांगितला. त्यांनी सांगितले की, जेव्हा मी शपथ घेतली तेव्हा मला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की एक फाईल पाठवली आहे बघा. त्या फाईलमध्ये लिहिले होते. की चार आठवडे पुरेल एवढाच गहू सरकारकडे होता. माझ्या देशातील भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी परदेशी धान्य आणावे लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यादृष्टीने उपययोजना केल्या आणि काही वर्षात भारत निर्यातदार देश झाला असल्याचे त्यांनी म्हटले.
 
जगात शेतीत जे बदल होत आहेत ते स्वीकारावे लागतील असेही पवार यांनी म्हटले. लोकसंख्या वाढली पण जमीन वाढली नाही. शेतीवरचा बोजा कशी कमी होईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. सगळ्यांनी शेती करण्यापेक्षा एकाने शेती आणि एकाने नोकरी करावी अशी भूमिका पवार यांनी मांडली. 


सर्वात मोठी अचिव्हमेंट कोणती?


सर्वात मोठी अचिव्हमेंट कोणती, असा प्रश्न विचारल्यानंतर पवार यांनी राज्यात कुठेही गेलं तरी लोक आस्थेने बोलतात ही अचिव्हमेंट असल्याचे प्रांजळपणे सांगितले. लोकांच्या जीवनात आणि राहणीमान बदल झाले की समाधान मिळते ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 


प्रत्येकाची इच्छा असते त्यात यश मिळाले नाही तर ना उमेद होता कामा नये. परिश्रम केलं तर आज ना उद्या यश मिळते असा मोलाचा सल्ला पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.  फार उत्तम मार्क मिळाले तर तो सगळीकड यशस्वी होतो असं नाही. 35 टक्के गुण मिळवणारा विद्यार्थीदेखील हुशार असतो माझा अनुभव असल्याचेही पवार यांनी सांगितले. जीवनात जर एखादी गोष्ट कळत नसेल तर ती जाणून घ्या. लहान-मोठं असं काही समजू नका, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, असा कानमंत्रीही त्यांनी दिला.


कॉलेजला बजाज यांचे नाव का?


इंजिनिअरिंग कॉलेजला बजाज यांचे नाव दिले का दिले? याचा उलगडाही पवार यांनी केला. बजाज यांचे नाव का देण्यात आले असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला. याला उत्तर देताना पवार यांनी म्हटले की, बजाज हे उद्योगती आहेत हे आपल्याला माहिती आहेत पण  बजाज कुटुंबीयांचे स्वातंत्र्यलढ्यातही मोठे योगदान आहे.  2009 पासून ते आजपर्यंत प्रत्येक वर्षी 5 कोटी रुपये देत आहेत. पण, त्यांनी कधीही आमचे नाव द्या, असे सांगितले नाही. बजाज हे स्वातंत्र्यसैनिक होते, गांधीजीचे शिष्य होते आणि ते उद्योगपती होते. त्यामुळे त्यांचे नाव देण्यात आले असल्याची माहिती पवार यांनी दिली.