Pune Crime News :  अनेकदा काही शेतकऱ्यांनी (Pune Crime News) गांज्याची शेती केल्याचं आपल्या कानावर येतंय. मात्र आता  इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे अफूची सामुहिक शेती करणाऱ्या सहा शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून इंदापूर पोलिसांनी 1 कोटी 41 लाख 74 हजार रुपये किमतीची 7 हजार 87 किलो वजनाची झाडे जप्त केली आहेत. 


काशीनाथ बनसुडे, दत्तात्रय बनसुडे, राजाराम शेलार, लक्ष्मण बनसुडे, माधव बनसुडे, रामदास शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. एन.डी.पी. एस.कायदा 1985 चे कलम 8,15, 18, 46 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी त्यांच्या माळेवाडी गावाच्या हद्दीतील जमिनीमध्ये थोडया थोड्या अंतरावर बेकायदेशीर रित्या विनापरवाना व्यवसायिक हेतूने एकूण सात हजार 87 किलो वजनाची अफूची झाडे लावली होती. सध्या पोलिसांकडून अफूच्या  किंवा अन्य अमली पदार्थ्यांच्या शेतीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. अमली पदार्थांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा तडाखा लावला आहे. 


पुरंदर तालुक्यातील सुप्यातदेखील अफुची शेती


दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सुपे येथे अफूची शेती करण्याऱ्यावर कारवाई करण्यात आली होती. अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये कारवाई केली होती. पोलिसांनी कारवाई करून अफूची बोंडे जप्त केली. अफूच्या बोंड्यांचं एकूण वजन 33  किलो 200 ग्रॅम अफू मिळाला. त्याची किंमत प्रति किलो 2000 रुपये दराने 44 हजार 400 रुपये आहे.  मयूर उत्तम झेंडे असे शेतकऱ्याचं नाव आहे. पोलिसांना या अफूच्या शेतीची माहिती मिळताच पोलिसांनी पाहणी सुरु केली होती. रात्रीपर्यंत पोलीस शोध घेत होते. मक्याच्या पिकात शेतकऱ्याने अफूची लागवड केल्याचं समोर आलं होतं. 


अफूची शेती करणं महाराष्ट्रात बेकायदेशीर आहे. तरीही अनेक शेतकरी अमली पदार्थांची शेती करताना दिसता. पैशासाठी हा शेतकऱ्याचा खेळ सुरु असतो. मात्र याचा पोलिसांना सुगावा लागला की शेतकऱ्यांवर कारवाई होते. अफूच नाही तर गांजाची लागवड केल्याचेदेखील प्रकार अनेकदा समोर आले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध परिसरातील शेतकऱ्यांवर अफूची किंवा इतर अमली पदार्थाची लागवड केल्याने कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या विशेष पथकाकडून अशा शेतकऱ्यांवर नजर देखील ठेवण्यात येते.