Pune News :  अनेकांना क्राईम स्टोरी ऐकायची, वाचायची आणि बघायची (Crime) आवड असते. गुन्हेगार कसे असतात? ते काय करतात? त्यांना कारागृहात कशी वागणूक मिळते किंवा चित्रपटात जसं कारागृह आणि गुन्हेगार राहतात तसं खरंखुरं कारागृह असतं का? असे अनेक प्रश्न अनेकांना पडत असतात. कैद्यांच्या आयुष्याबाबत जाणून घेण्याचं कुतुहूलदेखील अनेकांना असतं. त्याचमुळे आता पुण्यातील कारागृहामध्ये विद्यार्थ्यांना संशोधासाठी अभ्यास करता येणार आहे. राज्याच्या तुरुंग प्रशासनाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता ( Amitabh Gupta) यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. यामुळे कारागृहातील कैद्याच्या क्राईम स्टोरी आपल्याला ऐकायला, वाचायला मिळणार आहे.


महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामाजिक जीवनात मानवाच्या वागणुकीचा अभ्यास करण्यासाठी सामाजिक संशोधनाचा वापर केला जातो. मानवाच्या कोणत्याही वर्तणुकीचा अंदाज कोणी लावू शकत नाही. त्यासाठी कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या आणि सोशल वर्कचा अभ्यास करणाऱ्यांना अभ्यासक्रमांच्या संबंधित शैक्षणिक कारणास्तव कारागृहाला भेट द्यावी लागते. विविध विषयांवर राज्यातील तसेच देशातील विद्यापीठामार्फत संशोधन करण्यात येते़ कारागृहातील कैद्यांवर देखील संशोधन करण्यासाठी विद्यार्थी हे आपला संशोधन विषय निवडत असतात, या सगळ्या गोष्टी लक्षात घेत अमिताभ गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे. 
 
त्यांनी नोंदणीकृत संस्था, विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थी यांना संशोधनाकरीता कारागृह भेटीची परवानगी देण्याबाबतचे आदेश काढले आहेत. कारागृह विभागासाठी आक्षेपार्ह असलेला विषय वगळता इतर बाबींवर संशोधन करता येणार आहे. त्यासाठी अटींवर परवानगी देण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयातील जास्तीत जास्त 35 विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणास्तव कारागृह भेटीची परवानगी देखील देण्याचे आदेश देण्यात आले आहे.


मानसिक आयुष्यावर संशोधन 


कारागृहातील कैद्यांच्या मानसिक आरोग्यावर संशोधन होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. या संशोधनामुळे कैद्यांच्या समस्या त्यांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करणं सोपं होणार आहे. या सगळ्यांमुळे संशोधकांना आणि त्यांच्यामार्फत अनेकांसमोर कारागृहातील कैद्यांच्या आयुष्याचा त्यांच्या मानसिकतेचा उलगडा होणार आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे हे देखील कैद्यांवर संशोधनात्मक अभ्यास करणार आहेत. अशा प्रकारच्या संशोधनामुळे प्राप्त होणार्‍या अहवालामुळे सुधारणात्मक बदल घडण्यास मदत होईल,या संशोधनामुळे कैद्यांच्या समस्या तसेच विविध पैलूंवर प्रकाश टाकता येणार आहे, असं गुप्ता यांनी सांगितलं आहे.